खेडसह दापोली, मंडणगडमध्ये विजेच्या मागणीत वाढ, दररोज ३ दशलक्ष युनिटस् विजेची मागणी

उष्णतेच्या कडाक्याने गारवा देणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला
 खेड(प्रतिनिधी) सद्यस्थितीत उष्म्याने कहर केल्याने नागरिक कमलीचे हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या खेड विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या खेडसह दापोली व मंडणगड तालुक्यातील वीज ग्राहकांकडून गारवा देणाऱ्या उपकरणांचा वापर कमालीचा वाढला आहे. यामुळे दिवसाला ३ दशलक्ष युनिटसूची जादा मागणी वाढली असून तीनही तालुक्यात दररोज ३९ दशलक्ष युनिटस् विजेचा वापर होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
खेड, दापोली व मंडणगड तालुक्यात. १ लाख ५६ हजार ५४३ वीज ग्राहक आहेत. यामध्ये १ लाख ३६ हजार ८८३ घरगुता, ९५२० व्यापारी, १४१९ औद्योगिक, ४९५५ शेती, ७६४पाणीपुरवठा, १४६४ पथदीप, ८८ हायटेन्शन व ७०० इतर व दारिद्र्यरेषेखालील ७४८ ग्राहकांचा समावेश आहे. २३७१ विद्युतरोहित्रांच्या सहाय्याने ग्राहकांना वीजपुरवठा केला जात आहे. गत महिन्यात ग्राहकांकडून दिवसाला ३६ दशलक्ष युनिटस् विजेचा वापर होत होता.
एप्रिल महिन्यात उष्म्याने कहर केल्याने विजेचा वापर सर्रासपणे वाढला आहे. नागरिक उष्म्याने कमालीचे हैराण झाले आहेत. उष्म्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून गारवा देणाऱ्या उपकरणांच्या खरेदीसह त्यांच्या वापरातदेखील तितकीच वाढ झाली आहे. याशिवाय लग्नसराई, जत्रांसह सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे.
महावितरणच्या विभागीय।कार्यालयांतर्गत तीनही तालुक्यात वीज ग्राहकांच्या दररोजच्या ३६ दशलक्ष
युनिटसूच्या मागणीत गेल्या काही दिवसांपासून कमालीची वाढ झाली आहे. रखरखत्या उन्हामुळे सद्यस्थितीत दिवसाला ३९ दशलक्ष युनिट चा वापर होत आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी ७० टक्के, घरगुतीसाठी २५ टक्के, वाणिज्यसह शेती, पाणीपुरवठा, पथदीप आदींसाठी ५ टक्के वीज पुरवठा होत आहे. कडक उन्हामुळे एप्रिल ते मे महिन्यात विजेच्या वाढत्या मागणीमुळे देखभालीसाठी ५० लाखांहून अधिक खर्च येत असल्याची माहिती देण्यात आली.
खेड विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या खेड, लोटे, मंडणगड, दापोली १ व २ या पाच उपविभागातील त्या-त्या उपकेंद्रात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास पाचही उपविभागांनाजोडलेल्या रिंग फिडींग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला जात असल्याचे महावितणकडून सांगण्यात आले. यामुळे ऐन उष्म्यात नागरिकांना दिलासा मिळत आहे.