रेशन दुकानदारांना नव्या फोरजी ई- पॉस मशिनचे वाटप

 

राजापूर (वार्ताहर): रेशन दुकानदारांना जुन्या 2-जी ई-पॉस मशिनमधील तांत्रिक त्रुटींमुळे धान्य वितरण करण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून शासनाने आता रेशन दुकानदारांना फोरजी ई-पॉस मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत. राजापूर पुरवठा विभागाकडून तालुक्यातील रेशन दुकानदारांना नुकतेच या नव्या मशिनचे वाटप करण्यात आले असून प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार, गैरव्यवहार थांबविण्यासाठी, लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्यवाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण झाले आहे. लाभार्थ्यांची ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलातही आणला गेला. राज्यात १ मे २०१८ पासून संगणकीय वितरण प्रणालीद्वारे ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरण सुरू झाले.

 

रेशनवरील धान्य वितरणात ई-पॉस मशिन महत्त्वाची यंत्रणा आहे. ई-पॉस मशिनवर धान्य वितरण करताना योजनानिहाय शिधापत्रिकाधारकांचे अंगुठे घ्यावे लागतात. तांत्रिक अडचणीमुळे लवकर थंब इम्प्रेशन होत नाही. एका शिधापत्रिकाधारकाला ५१ ते २० मिनिटे वेळ द्यावा लागतो. परिणामी, जुन्या टू जी ई पॉस मशिनमधील त्रुटीमुळे धान्य वितरण प्रणाली विस्कळित झाली होती. अनेक ई-पॉस मशिनमधील सीमकार्ड निरुपयोगी झाले असताना, रेशन दुकानदार आपल्या मोबाईलद्वारे हॉटस्पॉट वापरून धान्य वितरण करीत होते. गर्दीच्या वेळी मशिनमधील तांत्रिक बिघाडामुळे रेशन दुकानदारांना शिधावाटप करताना बऱ्याच अडचणी आल्या. या कारणावरून ग्राहक आणि रेशन दुकानदार यांच्यात वादही होत आहेत. अखेर राज्याच्या पुरवठा विभागाने 4-जी प्रकारातील ई-पॉस मशीन्स पुरवठा विभागाला उपलब्ध करून दिल्या आहेत. पुरवठा विभागाला प्राप्त मशीन्स हे 4 जी प्रकारातील आहे. या यंत्रात दोन सिमकार्ड बसू शकतील. याशिवाय चार्जींगची सुविधा मशीनला असून, वायफायद्वारेदेखील मशीन जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे. सध्याच्या मशीनपेक्षा नवीन मशीन आकाराने मोठे असून, ते संपुर्णत टच क्रीन असल्याने ते हाताळण्यास अधिक सोपे आहे. मशीनमध्ये लाभार्थीच्या अंगठ्यासोबतच डोळ्यांच्या बायोमेट्रिकची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांना धान्य घेण्यासाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

 

दरम्यान राजापूर तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदार यांना जिल्हा पुरवठा अधिकारी रत्नागिरी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त नवीन ई-पॉस मशीनबाबत राजापूर पुरवठा अव्वल कारकून निलेश लाड यांच्या उपस्थितीत ओ.ए.एस. व्हाय.एस.कंपनीचे प्रतिनिधी मंदार नाचणेकर व दिपक आडविलकर यांचेकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रशिक्षणाचे वेळी तालुक्यातील सर्व दुकानदार यांना नवीन ई-पॉस मशीनचे वितरण करण्यात आले आणि जुन्या मशीन्स जमा करून घेण्यात आल्या. यावेळी तालुक्यातील रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.