रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील शिळ धरणात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार 22 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली.
स्मित वासुदेव आंबेकर (7), तनिष्क अक्षय आंबेकर (8,दोन्ही रा.फणसवळे कोंड,रत्नागिरी) अशी शिळ धरणात बुडून मृत्यू झालेल्या दोन अल्पवयीन मुलांची नावे आहेत. स्मित अंगणवाडीत शिकत होता. तर तनिष्क हा पहिलीत शिकत होता. सोमवारी दुपारी 1.45 वा. सुमारास दोघेही आपआपल्या घरी शाळेत चित्रकलेच्या स्पर्धेसाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडले होते. त्यानंतर ते शाळेत न जाता थेट धरण परिसरात गेले. त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी त्यांना पाहून हटकले. परंतू त्यांची नजर चुकवून ते पुन्हा धरणाच्या दिशेने गेले. त्याचेळी धरणाच्या भिंतीच्या वरील बाजुला फणसवळे कोंड गावचे सरपंच निलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर फिरण्यासाठी गेलेले असताना त्यांना हे दोघेही धरणाच्या दिशेने जाताना दिसले. त्यांनीही या दोघांना आवाज देत त्याठिकाणी जाउ नका असे सांगितले परंतू या दोन्ही मुलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत धरणात उड्या मारल्या. त्यांना उड्या मारताना पाहून सरपंच निलेश लोंंढे आणि दिलीप आंबेकर यांनी धरणाच्या दिशेने धाव घेतली. परंतू हे अंतर जास्त असल्याने धरणाच्या ठिकाणी जाई पर्यंत दोन्ही मुले पाण्यात बुडाली होती. निलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर यांनी पाण्यात उड्या मारत दोघांचीही शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा दिलीप आंबेकर यांना स्मित तेथील चिखल मिश्रीत पाण्यात सापडला. त्यांनी त्याला बाहेर काढून जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवले. त्यानंतर अर्ध्या तासानंतर तनिष्कचा मृतदेह निलेश लोढेंना मिळून आल्यावर त्यालाही जिल्हा शासकिय रुग्णालयात नेण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले.
स्मित आणि तनिष्कचे आई-वडिल शेती काम करुन आपला उदरनिर्वाह चालवतात ही घटना घडली तेव्हा स्मितचे आई वडिल शेतात तर तनिष्कचे आई वडिल घरीच होते. ग्रामस्थांनी त्यांना घडलेली हकिकत सांगितल्यावर त्यांनी टाहो फोडत जिल्हा शासकिय रुग्णालय गाठले. दरम्यान, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी आपल्या टिमसह जिल्हा शासकिय रुग्णालयात धाव घेतली होती. दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करुन सायंकाळी उशिरा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आले.











