The government is trying to make the medium of degree- diploma course in various branches with the preservation of the language– Name. Deepak Kesarkar
फोंडाघाट एज्यु. सोसा.ला मराठी भाषा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची धावती सदिच्छा भेट !
ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधावर, गतिमान निर्णय घेण्यासाठी निवेदनातून आग्रही मागणी !
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : महाराष्ट्र राज्यासह भारत देशाची वाटचाल,पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासाच्या दिशेने चालू आहे. आमचे सरकार सर्व स्तरातील जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन प्रशासन वेगवान करण्यासाठी कटिबद्ध आहे.भाषेच्या संवर्धनासाठी विविध शाखांच्या पदविका- पदवी माध्यम, मराठीतून करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.मातृभाषेतून सहज- सुलभ शिक्षण घेणे, सर्वांना शक्य होणार आहे.ग्रामीण भागातील विविध संस्था आर्थिक विवंचनेतून मोठ्या झाल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षातील बॅकलॉग आपण येत्या काही दिवसात भरून काढणार आहोत. फोंडाघाट एज्युकेशन संस्थेची आजवरची वाटचाल माझ्या डोळ्यासमोर झाली असल्याने, त्यांच्या असुविधा दूर करण्यासाठी आणि प्रलंबित बांधकामासाठी भरघोस निधी मिळवण्याकरिता मी स्वतः लक्ष घालून मागण्या पूर्ण करीन, असे आश्वासक उद्गार शिक्षणमंत्री नाम. दीपक केसरकर यांनी काढले. कोल्हापूरला जाताना त्यांनी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीला धावती सदिच्छा भेट दिली.
त्यांचे संस्थेच्या एन.सी.सी. कॅडेट यांनी संचलन करून यथोचित स्वागत केले. प्रवेशद्वारावर संचालक संजय आग्रे- उभयतांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर झालेला छोटेखानी स्वागत पर सोहळ्याचे प्रास्ताविक संचालक राजू पटेल यांनी केले. संस्थेची स्थापना- माहिती आणि कार्यपद्धती विषद करून,त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती होत असलेली मानसिकता दूर करण्यासाठी यद्ययावत सुविधा निर्माण करून, विविध प्रलंबित प्रश्नांना स्पर्श केला. यावेळी संजय आग्रे यांनी श्रीफळ- शाल- पुष्पगुच्छ देऊन नाम.केसरकर यांचा सत्कार केला. तर फोंडाघाट सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सौ. संजना आग्रे यांचा, त्याचप्रमाणे सोसायटी उपाध्यक्ष सौ.श्रद्धा दिलीप सावंत यांचाही यावेळी नाम. केसरकर यांनी गौरव केला.
यावेळी कॉलेज प्राचार्य फुलझडे आणि मुख्याध्यापक एस. एस. सावंत यांनी, आपल्या विभागाच्या समस्या मांडताना, प्रलंबित अनुदान,भरती करिता मंजुरी, वेतनवाढ इ. निदर्शनास आणून दिल्या. भरघोस निधीची मागणी केली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक सदस्य, शिक्षकवर्ग प्राध्यापक,कर्मचारी फोंडाघाट ग्रामस्थ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांकडूनही नाम.केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांसह, ग्रामपंचायत कडून सरपंच यांनी, तर संस्थेकडून विविध विषयावरील तक्रारी-समस्या- असुविधा यांची निवेदने मंत्री महोदयांना देताना, शासनाकडून गतिमान निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापक ज्ञानोबा फड यांनी केले.
___________