तळवली प्रशालेचे माजी मुख्याध्यापक जि.एस. जबडे यांचे निधन

Google search engine
Google search engine

तळवली प्रशालेतर्फे श्रद्धांजली अर्पण

गुहागर | प्रतिनिधी : पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथील माजी मुख्याध्यापक तसेच विद्यमान जेष्ठ शिक्षक म्हणून कार्यरत श्री गणपती संभा जबडे यांचे रविवार दि. 26 रोजी जत्राट या त्यांच्या मूळ गावी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या रुपाने एक हरहुन्नरी व उमदे व्यक्तिमत्त्व हरपले असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत असून हळहळ व्यक्त होत आहे. या निधनानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक बसवंत थरकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, श्री जबडे सर हे विद्यार्थीप्रिय व शिस्तप्रिय असे इंग्रजीचे शिक्षक म्हणून ओळखले जात असत.खेड्यातील विद्यार्थ्यानी सुध्दा इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, इंग्रजीचे लेखन सुरेख व नीट-नेटके असावे. विद्यार्थ्यांनी तसा प्रयत्न केला पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह असायचा. ते सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असताना पदावरील मुख्याध्यापकांशी त्यांची सहकार्याची भावना राहिली. माझे अत्यंत जवळचे मित्र व सहकारी असलेले जबडे सर त्यांच्या सेवेची अजून तीन वर्षं शिल्लक असताना आपल्याला सोडून गेले हे स्विकारायला मन अजून तयार नाही. तरी सुद्धा निसर्गनियमापुढे आपण काही करू शकत नाही या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विद्यार्थ्यांप्रमाणे सहकारी शिक्षकांमध्ये देखील जबडे सर प्रिय होते. ते सर्वांशी मिळून मिसळून असायचे. सहकार्यासाठी नेहमी तत्पर असायचे.. त्यांचे सर्वांशी मित्रत्वाचे संबंध होते. त्यांनी दोन वर्षे तळवली प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून अतिशय चांगले काम केले. तसेच सहाय्यक शिक्षक म्हणून सुमारे तीस वर्षे सेवा केली. तीन-चार वर्षांपूर्वी त्यांचे मोठे ऑपरेशन झाले होते तेंव्हा पासूनच ते थोडे खचले होते. परंतु जगण्याची प्रबळ इच्छा व जिद्दीच्या जोरावर आपण आजारातून बरे होऊ असे त्यांना वाटत होते. परंतु काळाने त्यांना अचानक हिरावून नेले.
जेष्ठ शिक्षक श्री देवरुखकर सर यांनी जबडे यांच्याबद्दल प्राथमिक माहिती दिली. त्यानंतर प्रशालेतर्फे सरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप चव्हाण हे उपस्थित होते.जबडे यांच्या निधनाने दिवसभरात फोन व मेसेज पाठवून पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री भालचंद्र चव्हाण, सचिव श्री सुधाकर चव्हाण, श्री मंगेश जोशी तसेच अनेक आजी-माजी विद्यार्थी, पालकांनी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.