आंबोलीत ४७ लाखांची दारू जप्त

आंबोली पोलिसांची कारवाई

बांदा (प्रतिनिधी) :
गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर आंबोली चेकपोस्टवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४६ लाख ८० हजार रुपये किमतीचे ९७५ दारूचे बॉक्स पकडण्यात आले. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे २५ लाखांचा कँटर (टीएन ७२ सीबी ७५०३) असा एकूण ७१ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी पुलूदैय्यार तिरुवनामल्लाई (रा. थोतूकुडी, तामिळनाडू) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

      याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोली चेकपोस्टवर वाहनांची तपासणी सुरू असताना बेळगावकडे जाणाऱ्या आयशर कँटरला तपासणीसाठी थांबविण्यात आले. तपासणी दरम्यान कँटर मध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. रॉयल ग्रँट माल्ट व्हिस्कीचे तब्बल ९७५ दारूचे बॉक्स (४६,८०० बाटल्या) ताब्यात घेण्यात आले. तसेच दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेला कँटरही जप्त करण्यात आला.

     सदर कारवाईत पोलीस कर्मचारी दत्तात्रय देसाई, सुमित पिरनकर, दीपक शिंदे, मनीष शिंदे, राजेश नाईक आदींचा सहभाग होता.