तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते खोपीफाटा येथील काम, काही घरांसह दुकाने हटवली
खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीपासून परशुराम घाटापर्यंतचे चौपदरीकरण जवळपास पूर्ण झाल्याने प्रवास सुस्साट झाला आहे. मात्र वेरळ – खोपीफाटा येथील दुहेरी चौपदरीकरणाचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते. अखेर गेल्या दोन दिवसांपासून येथील दुहेरी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
खवटीपासून परशुराम घाटापर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांचा प्रवास गतिमान झाला आहे. परशुराम घाटातील काही भाग वगळता इतर मार्गावरील चौपदरीकरण जवळपास अंतिम टप्यात आले आहे. दाभिळ व लवेल येथील रखडलेले चौपदरीकरणाचे काम देखील मार्गी लागले आहे.
तालुक्यातील वेरळ – खोपीफाटा येथे मात्र दुहेरी मार्गाचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते. येथील दुहेरी मार्गाच्या चौपदरीकरणात संपादित झालेले घर व काही दुकाने देखील जमिनदोस्त करण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दुहेरी मार्गाच्या चौपदरीकरणासाठी सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या काही दिवसांतच येथील दुहेरी मार्गाचे चौपदरीकरण देखील पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.









