महायुतीचे उमेदवार ना.नारायण राणे यांनी विविध संघटनांसह व्यावसायिकांशी साधला संवाद

रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासह केली महत्वाच्या विषयांवर चर्चा

रत्नागिरी । प्रतिनिधी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची रत्नागिरीतील विविध संघटना, प्रतिष्ठीत नागरिक, व्यावसायिक, उद्योजक यांनी भेट घेऊन विविध प्रश्नांवर गुरूवारी हॉटेल व्यंकटेश डायनिंग याठिकाणी चर्चा केली. रत्नागिरीचा सर्वांगीण विकास आणि त्यामध्ये केंद्र सरकारचे योगदान या विषयावर झालेल्या या गाठीभेटीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

 

 

 

कोकणच्या विकासासाठी गेली अनेक वर्षे झटणारे कोकणचे नेते आणि लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधदुर्ग मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी दिवसभर रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. यामध्ये रत्नागिरीसह औद्योगिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर गद्रे मरीनच्या माध्यमातून स्वत:ची ओळख निर्माण केलेले दीपक गद्रे, जागृत मोटर्सच्या रेश्मा जोशी, प्रसिद्ध विधीतज्ज्ञ प्रदीप नेने यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते व विधीतज्ज्ञ बाबासाहेब परुळेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विधीतज्ज्ञ दीपक पटवर्धन, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायातदार संघटनेसोबतही ना. राणे यांची बैठक पार पडली. यावेळी हवामानात होणारे बदल, बागायतदार व्यावसायिक यांच्यासमोरील आव्हाने, अडचणी आणि आंबा निर्यात क्षेत्रातील नवीन संधी, केंद्र सरकारचे याबाबतचे धोरण या संदर्भात उपस्थितांशी चर्चा झाली. यावेळी प्रसन्न पेठे, प्रदीप सावंत व अन्य व्यापारीवर्ग उपस्थित होता.

 

 

रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेटही ना. नारायण राणे यांनी घेतली. यावेळी  समाजाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सुजित झिमण, चंद्रकांत परवडी, प्रकाश मांडवकर तसेच  अन्य मान्यवर उपस्थित होते.