संतोष वायंगणकर
२०१४ साली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे निलेश राणे विरूद्ध शिवसेनेचे विनायक राऊत अशी लढत झाली होती. या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती.
या मोदी लाटेचा फायदा विनायक राऊत यांना झाला. भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी काम केलं. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार अनंत गिते विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनिल तटकरे अशी लढत झाली.
या निवडणुकीत पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीत असलेल्या चिपळूणचे माजी नगराध्यक्ष रमेश कदम यांनी शेतकरी कामगार पक्षातर्फे निवडणुक लढवली. शिवसेना-भाजपा युतीचे अनंत गिते यांना ३९६१७८ मत मिळाली. राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांना ३९४०६८ मत मिळाली. तर शेतकरी कामगार पक्षाचे रमेश कदम यांना १२९७३० मत मिळाली.
या निवडणुकीत सुनिल तटकरे यांचा २००१० मतांनी पराभव झाला. अनंत गिते तेव्हा विजयी झाले. लोकसभेच्या निवडणुकीतील दोन हजार मतांनी त्यांचा झालेला पराभव सुनिल तटकरे यांच्या फार जिव्हारी लागला होता. २०१९ च्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनिल तटकरे विजयी झाले. त्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे अनंत गिते पराभूत झाले. सुनिल तटकरे ३१,४३८ मतांनी विजयी झाले होते.
२०१९ च्या त्या निवडणुकीत रायगड मतदार संघातून राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे धरून आणखी दोन सुनिल तटकरे निवडणुक रिंगणात उतरले होते. अन्य दोन सुनिल तटकरे अपक्षच होते. यातील एका सुनिल तटकरेंना ९७५२ मत मिळाली होती. तर दुसऱ्या एका अपक्ष सुनिल तटकरेंना ४,१२६ इतकी मत मिळाली होती. आणि यात विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत १६ उमेदवार निवडणुक रिंगणात उभे होते. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीचे विनायक राऊत विरूद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निलेश राणे यांनी निवडणुक लढवली होती.
समोर सेना-भापजा युती आणि फक्त स्वाभिमान पक्षसोबत या निवडणुकीत निलेश राणे यांना २,७९७०० मत मिळाली होती. पावणे तीन लाखांवर मत ही फक्त राणे यांना मानणारी होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी फॅक्टर चालला आणि याचाच फायदा नेमकेपणाने विनायक राऊत यांना होऊ शकला. बदललेल्या मतदारसंघाची ही तिसरी निवडणुक आहे. निवडणुक काळातील राजकीय पक्षांतील गमती-जमती काही कटू काही आनंददायी घटना घडत असतात. निवडणुक कालावधीतील जुन्या आठवणी काही घटना या राजकारणातील पूर्वीची समिकरण कशी होती.
त्यातले किती संदर्भ आज लागू होतात. त्यातल्या गमती-जमतीही आपणाला यापुढेही पहायच्या आहेत.









