दुचाकी अपघातात सासोलीतील युवकाचा मृत्यू

मणेरी – कलमठाणा येथील दुर्घटना

दोडामार्ग (प्रतिनिधी) :    समोरून येणाऱ्या वाहनाने हूल दिल्याने चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकाला धडकली. या अपघातात जखमी भाविक गुरुदास गवस (१७, रा. सासोली) या युवकाचा बांबोळी रुग्णालयात अखेर उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मणेरी – कलमठाणा येथे शुक्रवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला. भाविकच्या अपघाती जाण्याने सासोली गावावर शोककळा पसरली आहे.

 

सासोली येथील भाविक गवस हा दोडामार्ग हून सायंकाळी मित्रासमवेत दुचाकीवरून घरी येत होता. मणेरी कलमठाणा येथे समोरून वेगात येणाऱ्या वाहनाने त्याला हूल दिली. दरम्यान भाविकचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी रस्त्यालगत दुभाजकाला आदळली. अपघातात दुचाकीवरून भाविक व त्याचा मित्र खाली कोसळले. अपघातात भाविक जबर जखमी झाला. तर त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत झाली.

 

स्थानिकांनी जखमींना तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून भाविकला अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सासोली गावावर शोककळा पसरली आहे.