Mumbai : चोरांना पकडायला गेला पोलीस, टोचलं इंजेक्शन; पोलिसाचा 3 दिवसांनी मृत्यू

मुंबई : मुंबईतील एका पोलीसाचा बुधवारी मृत्यू झाला. मध्य रेल्वेच्या पोलीस उपायुक्तांनी याबाबत धक्कादायक अशी माहिती दिली. चोरांनी मिळून पोलिसांना विषारी द्रव्याचे इंजेक्शन टोचलं होतं आणि त्यानंतर पोलिसाची प्रकृती बिघडत होती.

पोलिसांनी आता या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

ठाण्यात राहणारे पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार हे वरळीत तैनात होते. तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. २८ एप्रिलला चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. चोरांनी त्यांना विषारी द्रव्याचं इंजेक्शन दिलं यामुळे प्रकृती बिघडत होती. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, उपायुक्त मनोज पाटील म्हणाले की, उपचारावेळी पवार यांची प्रकृती बिघडली आणि बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.

दादर गव्हर्नमेंट रेल्वे पोलीसांच्या एका कर्मचाऱ्याच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने म्हटलं की, विशाल पवार लोकल ट्रेनने सिव्हील कपड्यात ड्युटीवर जात होते त्यावेळी ही घटना घडली. ट्रेन माटुंगा आणि सायन परिसरात रात्री साडेनऊ वाजता स्लो झाली तेव्हा प्लॅटफॉर्मवर उभा असलेल्या एका व्यक्तीने विशाल पवार यांच्या हातावर मारलं.

विशाल पवार यांच्या हातातून फोन निसटला आणि तो फोन उचलून चोर पळाले. लोकल स्लो असल्याने विशाल पवार यांनी त्यांचा पाठलाग केला. पण काही अंतरावर चोरांच्या साथीदारांनी त्यांनाच घेरलं. विशाल पवार यांनी विरोध करताच त्यांना मारहाण केली. यावेळी मागून कुणीतरी विशाल पवार यांना विषारी इंजेक्शन टोचलं. यासोबतच लाल लिक्वीड त्यांच्या तोंडात टाकलं गेलं.