महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांचा घणाघात
शिव्या देणारे विकास करू शकत नाहीत; तुमचे मत फुकट घालवू नका
- कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे मतदारांना केले आवाहन
रत्नागिरी (प्रतिनिधी)
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रचाराच्या महासभेमध्ये महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात करताना शिवसेना घडत असताना ते कुठे होते हे त्यांनी अगोदर सांगावं व मगचं त्यांनी शिवसेनेबाबत बोलावे असे सुनावले.
या निवडणुकीत आपण विकासावर बोलत आहोत, तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन नरेंद्र मोदी यांना हा देश जगात अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर न्यायचा आहे. या देशाला महासत्ता बनवत असताना सर्वसामान्य जनतेचा आर्थिक स्तर सुधारून त्यांना उत्तम जीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यायची आहे. पण दुसऱ्या बाजूला २७ पक्षांची खिचडी असलेल्या इंडी आघाडीकडे असे प्रचाराचे आणि विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत, म्हणूनच ते विकासावर बोलत नाहीत. ते फक्त आरोप करत आहेत. इथला खासदार दोन वेळा नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून गेला, सत्तेत राहिला. परंतु त्यावेळी उद्धव ठाकरे केवळ आरोप करत राहिले. त्यामुळे इथला विकास १० वर्षे मागे राहिला. आता या खासदाराला असे पाडा की तो परत उठलाच नाही पाहिजे, असा निर्धार करा. आणि या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त करून त्याला घरचा रस्ता दाखवा, असा हल्लाबोल ना. राणे यांनी केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना घडवत असताना आम्ही त्यांच्या सोबत होतो. रक्ताचे पाणी करून आम्ही शिवसेना वाढविली. मी ३९ वर्षे शिवसेनेत काम केलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मला शिवसेना काय आहे ते शिकवू नये, शिवसेना घडत असताना ते कुठे होते हे त्यांनी अगोदर सांगावं, असा टोला ना. राणे यांनी लगावला. आता त्यांच्या हातातून सत्ता गेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा तोल सुटला आहे. मानसिक संतुलन बिघडल्यासारखं ते काहीही बोलत आहेत. हिंदुत्व जपणारी बाळासाहेबांची शिवसेना होती, आताचा त्यांचा उबाठा गट म्हणजे शिव्यांची उद्धव सेना आहे. केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्वाशी गद्दारी करून उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यांना इथल्या विकासाशी काहीही देणेघेणे नाही. आपल्याला मात्र या निसर्गरम्य भागाचा विकास करायचा आहे. कोकण म्हणजे सर्वांगीण प्रगती हे उदाहरण जगात सिद्ध करूया. त्यासाठीच केंद्रात मोदी सरकार आले पाहिजे. शिव्या देणारे प्रगती करू शकत नाही, तेव्हा तुमचे मत फुकट घालवू नका. नरेंद्र मोदींची निशाणी कमळ आहे, त्या निशाणीवर मी उभा आहे, त्यामुळे ७ मे रोजी माझ्या नावासमोरील कमळ या निशाणीचे बटण दाबा आणि तुमच्या सेवेची संधी मला द्या, असे आवाहन ना. राणे यांनी केले. तर आपल्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शाह रत्नागिरीत आल्याबद्दल अत्यानंद झाल्याचे नमूद करत राणे यांनी शाह यांचे ऋण व्यक्त केले.











