कणकवली : तालुक्यातील भिरवंडे गावच्या सरपंच सुजाता सावंत यांच्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेला बडतर्फीचा निर्णय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अंशतः बदल करून कायम ठेवला आहे. त्यामुळे सुजाता सावंत यांना सरपंच पदासह सदस्य पदावरून देखील अपात्र केले आहे. याबाबतचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांकडून पारित करण्यात आले आहेत. कोकण विभागीय आयुक्तांनी भिरवंडे सरपंच सुजाता सावंत यांना सरपंच पदावरून बडतर्फ केले होते. या निर्णयाविरोधात सुजाता सावंत यांनी ग्राम विकास मंत्र्यांकडे अपील केले होते.
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सरपंच सुजाता सावंत यांचे अपील वर निर्णय देताना त्यांना सरपंच पदावरून बडतर्फ करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच सरपंच पदासोबत सदस्य पदावरूनही त्यांना अपात्र करण्याबाबतचे आदेश पारित केले आहेत. तत्कालीन सरपंच सुजाता सावंत यांनी अभिलेख नमुना नं. २३ मध्ये नोंद नसतानाही भिरवंडे चव्हाटा ते नाटळकर घरापर्यंत जाणारा व सतिश नाटळकर घरापर्यंत जाणारा रस्ता या कामासाठी दाखला दिला होता. मूळ अभिलेखात नोंद नसतानाही नमुना नं.२३ सहीसूद दाखला प्रत देवून सुजाता सावंत यांनी कर्तव्यात कसूर केली. तसेच त्यांनी सदर चूक मान्य केली. त्यामूळे हलगर्जीपणा आणि अनियमितता केल्या प्रकरणी कोकण आयुक्तांनी बडतर्फीचा निर्णय दिला होता.