कोरेगाव-संगलट रस्त्याची डागडुजी न झाल्यास आंदोलन

 

खेड(प्रतिनिधी तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील कोरेगाव-संगलट रस्त्याची दैनावस्था झालेली असतानाही अद्यापही मार्ग सुस्थितीत आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून कुठल्याच हालचाली सुरू झालेल्या नाहीत. पावसाळा तोंडावर येवून ठेपलेला असतानाही रस्त्याची डागडुजीच न झाल्याने येत्या काही दिवसात रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास वाहने रोखण्याचा इशारा संगलट येथील सामाजिक कार्यकर्ते हमीद गुलाममोहिदीन नाडकर यांनी दिला आहे.

या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. रस्त्याची
दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने अद्याप दाद दिलेली नाही. याच मार्गावरून बहिरवली परिसरातून बेकायदेशीरउत्खनन केलेल्या वाळूची चोरट्या पद्धतीने राजरोसपणे वाहतूक सुरू असते. याचमुळे रस्ता आणखीनच बिकट बनला आहे.
पावसाळा तोंडावर येवून ठेपलेला असतानाही मार्गाच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाला सवडच मिळालेली नाही. त्यामुळे मार्गाच्या दुरूस्तीसाठी प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास रस्ता रोखण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केल्याचे नाडकर यांनी सांगितले.