खेड (प्रतिनिधी) भरणे ग्रामपंचायत हद्दीतील विस्कळीत पाणीपुरवठा अखेर पूर्ववत झाल्याने ऐन सुट्टीच्या हंगामात ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या पंपामध्ये सातत्याने निर्माण होणाऱ्या बिघाडामुळे पाणीपुरवठा खंडित होत होता. भरणे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्यातील व्यत्यय दूर करण्यासाठी चांगल्या दर्जाचे पंप खरेदी केले आहेत. यामुळे पंपांमध्ये होणारा तांत्रिक बिघाड दूर होवून जलवाहिनीतील त्रुटीही संपुष्टात आल्या आहेत. यामुळे मुबलक प्रमाणात ग्रामस्थांना पाणीपुरवठा वितरीत होत आहे. सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने चाकरमानी गावी दाखल झाले आहेत. भरणे परिसरातील सुरळीत पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.











