खेड प स चा टँकर मातीत रुतून बसतो तेव्हा….

 

खेड(प्रतिनिधी) तालुक्यात १२ गावे ३५ वाड्यांना एक शासकीय व एका खासगी टँकरद्वारे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील घेरारसाळगड-ओझरवाडी येथील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी रविवारी गेलेला येथील पंचायत समितीचा शासकीय टँकर पाणीपुरवठा करून माघारी परतताना अचानक मातीतच रूतून अडकला. चालकाने शर्थीचे प्रयत्न करून देखील टँकर मातीतून बाहेर निघालाच नाही. यामुळे टँकरचालकासह पाणी विभागाच्या एका अधिकाऱ्यास घटनास्थळीच रात्रभर मुक्काम ठोकावा
लागल्याची बाब समोर आली आहे

 

येथील पंचायत समितीचा टँकर घेवून चालक विश्वनाथ चव्हाण व पाणी विभागाचे अधिकारी शंकर घाडगे घेरारसाळगड-ओझरवाडी येथे गेले होते. घेरारसाळगड येथील पेठवाडी, तांबडवाडी, बौद्धवाडी, निमणी- धनगरवाडी, ओझरवाडी आदी ५ वाड्यांना पाणीटंचाईचे चटके बसत आहे. ओझरवाडी येथील ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.
पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल होवू नयेत, याकरिता प्रशासनाकडून सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र घेरारसाळगड-ओझरवाडी येथे पाणीपुरवठा करून माघारी परतणारा शासकीय टँकर मातीत फसल्याने प्रशासनाची मोठी अडचण निर्माण झाली. एकीकडे टंचाईग्रस्त गाव- वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत. असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाकडे एक शासकीय व एक खासगी असे दोनच टँकर उपलब्ध आहेत.

यातील ६ हजार लिटर क्षमतेचा एक टँकर ओझरवाडी येथे फसल्याने सोमवारी तहानलेल्या गाव-वाड्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला. सोमवारी दुपारपर्यंत ट्रॅक्टरच्या सहाय्याने फसलेला टँकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. यासाठी ग्रामस्थांनीही प्रयत्न केले. अखेर दुपारच्या सुमारास फसलेला टैंकर बाहेर येताच साऱ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.