राजकीय दृष्टीने वातावरण प्रदुषित करून गावच्या विकासाला खीळ घालू नका
सरपंच सौ. आर्या वारंग, उपसरपंच दत्ता काटे यांचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) :
सावडाव धरण प्रकल्पास सावडाव ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा विरोध नाही. राजकीय दृष्टीने वातावरण प्रदुषित करण्याचे प्रयत्न चालू आहेत . अशा चुकीच्या प्रयत्नांना सावडाव ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्त शेतकरी भिक घालणार नाहीत. कारण शासनाने सदर प्रकल्पासंदर्भात तीन बैठका घेतल्या. त्यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. या बैठकीतून शासन स्तरावरील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्यती माहिती दिली आहे.त्यामुळे बाहेरून येवून गावात राजकारण कोणीही करू नये असे सरपंच सौ. आर्या वारंग, उपसरपंच दत्ता काटे याने सुनावले आहे.
सावडाव धरण क्र.२ संदर्भात सावडाव ग्रामपंचायत व लघु पाटबंधारे प्रशासन यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक १६ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये एकुण १६४ प्रकल्पग्रस्तांपैकी ९७ सातबाराधारक शेतकरी उपस्थित होते. तर ३९ सातबाराधारक प्रकल्पग्रस्त शेतकरी मुंबईस्थित असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यापैकी काही प्रकल्पग्रस्त बरोबर भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यांचाही या प्रकल्पाला पाठींबा असल्याचे सांगितले. त्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्याच्या सर्व शंकांचे निरसरण दत्ता देशमुख तसेच उपअभियंता श्री. शिरोडकर यांनी प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या भुसंपादनाची प्रक्रिया सविस्तरपणे समजावुन सांगितली. शेतकऱ्यांनी अनेक प्रश्नांद्वारे चर्चेत भाग घेऊन माहिती समजावुन घेतली.
उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी सावडाव गावासाठी आणि गावाच्या विकासासाठी सदर धरण प्रकल्प अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर आहे असे उपस्थितांचे मत होते. तसेच पाणीटंचाईची व्यथा, पर्यटनातुन गावाचा विकास साधण्यासाठी सदरील धबधबा बारमाही सुरू राहण्यासाठी तरतुद करणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाला आमचा १०० टक्के पाठींबा आहे असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर शासनाकडुन कुठल्याही प्रकल्पबाधित कुठल्याही शेतकऱ्यांवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होणार नाही. त्यांच्या जमिनीचा झाडेझुडपांचा योग्यतो मोबदला मिळण्यासाठी योग्यती कार्यवाही शासन स्तरावर होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर वेळोवेळी शेतकऱ्यांना आवश्यक असणारी माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी. अशी एकमुखी मागणी करण्यात आली. अधिकाऱ्यानी ही गोष्ट तात्काळ मान्य केली.
सावडाव ग्रामपंचायत प्रकल्पग्रस्त मिळून एक समन्वय समिती नेमण्यात आली. जेणेकरून शासन स्तरावर प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा पाठपुरावा करणे सोपे होईल म्हणून एकूण २० प्रकल्पग्रस्तांची समिती स्थापन करण्यात आली. समिती अध्यक्ष म्हणून परशुराम झगडे, उपाध्यक्ष सुभाष वारंग, सचिव तुकाराम उर्फ संतोष तेली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. आर्या वारंग, उपसरपंच दत्ता काटे, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ खांदारे, सरपंच व्यंकटेश वारंग, तंटामुक्ती अध्यक्ष संजय झगडे, वसंत गंगाराम कदम, दशरथ पांडुरंग पुजारे, यशवंत वारंग, नारायण श्रीकांत प्रभुदेसाई, जयश्री दत्ताराम गावकर, श्रीमती लक्ष्मी सत्यवान सावडावकर इ. असे एकूण ४० प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
शासनाने प्रत्यक्ष केलेल्या शेतकऱ्यांच्या सह्यांच्या सर्वेक्षणाची प्रत उपलब्ध ग्रामपंचायत सावडाव येथे उपलब्ध करून दिली आहे. तसेच पुढील कार्यवाही कशाप्रकारे होणार याचे लेखी पत्र सावडाव ग्रामपंचायत येथे दिली आहे. त्यामुळे सदर प्रकल्पात कोणतीही अनियमितता दिसून येत नाही. काही लोकांनी राजकीय हेतुतून प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करून गावातील सामाजिक ऐक्य भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांना शंका असतील किंवा आवश्यक माहिती हवी असेल त्यांच्यासाठी ग्रामपंचायत सावडाव सर्वतोपरी शेतकऱ्याला सहकार्य करेल. आणि पुर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने शेवटपर्यंत असेल. असे सरपंच सौ. आर्या वारंग, उपसरपंच दत्ता काटे सांगितले.












