जीवितहानी झाल्यास महावितरण व चिपळूण नगरपालिका सर्वस्वी जबाबदार- साजिद सिरगुरोह
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील गोवळकोट, गोवळकोट रोड व पेठमाप येथील रस्त्यालगत असणाऱ्या झाडांच्या फांद्या विजेच्या तारेला लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. या फांद्या तात्काळ छाटाव्यात, अशी मागणी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी महावितरण व नगरपालिका चिपळूण यांच्याकडे केली आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला महावितरण व चिपळूण नगरपालिका सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशाराही श्री. सरगुरोह यांनी दिला आहे.
नुकत्याच झालेल्या अवेळी पावसामुळे अतिवृष्टीने काही गावात झाडे पडून घरांचे नुकसान झाले आहे. गोवळकोट, गोवळकोट रोड व पेठमाप चिपळूण शहर लगत आहेत. या रस्त्यांच्या दुतर्फा मोठमोठी झाडे आहेत. रस्त्यावरून हजारोच्या संख्येने वाहने ये-जा करत असून रहदारी कायम असते. गेले तीन-चार दिवस पाऊस व वारा सुरू असल्याने झाडांच्या फांद्या विजेच्या तारेला लागत असल्याने नागरिक आपला जीव मुठीत घेऊन चालत आहेत. झाडांच्या फांद्यांची छाटणी पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक होती. मात्र महावितरणच्या व चिपळूण नगरपालिकेचे अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुढील चार दिवसात झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या नाही तर काँग्रेस स्टाईलने निषेध करू, असा इशारा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सुरगुरोह यांनी दिला आहे.











