चिपळूण शहर बौद्ध समाज समन्वय समितीचे मुख्याधिकारी भोसलेंना निवेदन
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमींचे प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी चिपळूण शहर बौध्द समाज समन्वय समितीने सोमवारी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गोवळकोट, पेठमाप येथील पाच बौद्धवाडीच्या स्मशानभूमीबाबत आमदार शेखर निकम यांनी सूचना केल्याप्रमाणे स्मशानभूमीची योग्य ती दुरुस्ती करण्याबाबत आपल्या कार्यालयाकडे वारंवार पत्रव्यवहार करुनही आजपर्यंत दखल घेतलेली नाही. तसेच ओझरवाडी येथील दफन भूमीबाबतही वारंवार पत्रव्यवहार करुनही लक्ष दिले जात नाही. काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ओझरवाडी येथील स्मशानभूमीची पाहणी केली. मात्र गोवळकोट, पेठमाप येथील स्मशानभूमीच्या पाहणीसाठी आलेच नाहीत. शहरातील बौद्ध समाजाच्या या कामांबाबत आपण कोणतीही दखल घेतलेली नाही. मग मागासवर्गीय निधी नगर परिषदेकडे प्राप्त होत असताना तो अन्य कोणत्या विकासाकडे वर्ग केला जातो का, असा प्रश्न आम्हाला पडत आहे. आमच्या कामांकडे होणारे दुर्लक्ष हा अन्याय असून शहरातील बौद्ध समाज विकासात्मक कामातून वंचित रहात आहे. तरी वरील कामांबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष जयंत जाधव, चिटणीस संदेश कदम, सहचिटणीस अरुण कदम, खजिनदार अतुल कदम, एस. के. जाधव, राजेंद्र जाधव, विलास जाधव, दिलीप मोहिते, संदीप कदम, संतोष पवार, विजय कदम, चंदन कदम, महेश तांबे आदी उपस्थित होते.












