केंद्र व राज्य शासनाच्या लोकोपयोगी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा : राजन तेली

Reach the welfare schemes of central and state governments to the people at the grassroot level: Rajan Teli

भाजपच्या ‘महाविजय यात्रे ‘चा कोलगाव येथे भव्य शुभारंभ

सावंतवाडी । प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या अनेक लोकोपयोगी योजना प्रशासनाकडून यशस्वी पध्दतीने राबविल्यास एकही घर उपाशी राहणार नाही किंवा एकही रुग्ण उपचाराशिवाय दगावणार नाही. त्यासाठी या योजना तळागाळात पोचण्यासाठी व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.
भाजपाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘महाविजय यात्रे ‘चा शुभारंभ बुधवारी कोलगाव येथून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेश सारंग, माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब, आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगावकर, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, चंद्रकांत जाधव, रोहित नाईक, माजी सरपंच संदीप हळदणकर, अब्दुल साठी, आत्माराम चव्हाण आदी उपस्थित होते.
भाजपाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या विविध योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या महाविजय यात्रेची कोलगाव पासून सुरूवात करण्यात आली आहे. या माध्यमातून शासनाकडुन राबविण्यात येणार्‍या योजना जास्तीत-जास्त लोकांपर्यत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. आगामी काही दिवसांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका येणार आहेत. या निवडणूकांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.

दरम्यान, मागच्यावेळी जिल्हा परिषद निवडणूकीत अवघ्या काही मतांनी महेश सारंग यांना आपला पराभव पत्करावा लागला. परंतू याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी सर्वानी दक्षता घेणे गरजेचे आहे. महेश सारंग कट्टर कार्यकर्ता आहेत. त्याच बरोबर सच्चा समाजसेवक आहे. आपल्या गावाचा मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी त्याचे कायम प्रयत्न असतात. त्यामुळे अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी येणार्‍या काळात कोलगावातील जनतेने ठाम पणे उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी महेश सारंग यांनी या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी गावाच्या विकासासाठी आला आहे. पाणी पुरवठा योजनेसह साकव रस्त्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे आता येथील जनतेने भाजपा सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी संजू परब, रवी मडगावकर यांनीही आपले विचार मांडले.