जगबुडी नदी कसा घेणार मोकळा श्वास?

केवळ एक जेसीबी मशिनद्वारे गाळ उपसा; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अशक्य
खेड (प्रतिनिधी)
शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीतील गाळ उपशाला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र, या कामासाठी फक्त एक जेसीबी मशिन आणि तीन डंपर जलसंपदा विभागामार्फत वापरले जात आहेत. त्यामुळे जगबुडी नदीतील गाळ पावसाळ्यापूर्वी काढता येईल का? पाऊस सुरू झाल्यावर आता केलेला खर्च पुन्हा गाळ साचून वाया जाईल, अशी चर्चा सुरू आहे.
सीआरझेडची परवानगी तसेच इतर कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर जगबुडी नदीचा गाळ खेड काढायला सुरुवात झाली. भरती-ओहोटीची वेळ लक्षात घेऊन दिवसातून फक्त दोन ते तीनच तास गाळ काढण्याचे काम होते आहे. पावसाळ्यापर्यंत या पद्धतीने जर काम सुरू राहिलं तर जगबुडी नदी मोकळा श्वास कसा घेईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नदीला पूर आल्यानंतर मच्छी मार्केट परिसरातून शहरातून पाणी शिरते. या भागात जलसंपदा विभागाकडून गाळ काढण्यात येत आहे.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर चिपळूण मधील वाशिष्ठी तर महाडमधील सावित्री नदीच्या गाळ काढण्याच्या कामाला तत्काळ गती मिळाली होती. त्यामुळे वाशिष्ठी नदीने गेल्याच वर्षी मोकळा श्वास घेतला. पात्र किमान दीड ते दोन मीटर खोल गेल्यामुळे गेल्या वर्षी चिपळूणला पुराचा तडाखा बसला नाही. महाडची परिस्थितीदेखील तशीच आहे. मात्र, जगबुडी नदीच्या गाळ काढण्याचे प्रत्यक्ष काम सुरू व्हायला उशीर झाला आहे.
खासगी संस्थांची मदत आवश्यक 
मान्सून कोकणच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे जगबुडी नदी गाळमुक्त करण्यासाठी सरकारने खासगी सेवाभावी संस्था, स्थानिक समाजसेवी संस्था यांना साद घालणे आवश्यक आहे. लोक सहभागातून जगबुडीच्या गाळ मुक्तीसाठी एकवटण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.