खेड बसस्थानकातील खड्ड्यांचा आकार वाढतोय

खेड(प्रतिनिधी)
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या येथील एसटी आगाराच्या बसस्थानकात बसफेऱ्यांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. अशा गजबजलेल्या बसस्थानकाच्या उत्तर व दक्षिण प्रवेशद्वालगत खड्डेच खड्डे निर्माण झाले असून अवकाळी पावसामुळे आवार खड्ड्यातील चिख़लमिश्रित पाण्याने भरून जात आहे. शिवाय एसटीच्या रहदारीमुळे चिखलमिश्रीत पाणी प्रवासात असलेल्या प्रवाशांच्या अंगावर उडून स्वच्छ कपडे खराब होण्याचे प्रकार घडत आहेत.
शहरासह तालुक्याला अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून झोडपून काढण्यास सुरूवात केली आहे. शिवाय धुवाँधार पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे येथील एसटी बसस्थानकातील काही होर्डिंगना धोका पोहचला आहे. यातील एक होर्डिंग तर अवर्धवट वाकून कोसळण्याच्या स्थितीत होते. एसटी प्रशासनाने धोकादायक होर्डिंग हटवून प्रवाशांना दिलासा दिला होता. मात्र, बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य वाढता वाढतच चालले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून चिखलमिश्रित बनत आहे. त्यामुळे खड्डयांचा अंदाज स्थानकात वावरणाऱ्या प्रवाशांना येत नाही.