१४८ सासुरवाशिणींचा त्यांच्या कुटुंबातील पुरुषांकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मान

 

मौजे रूण ग्रामविकास मंडळ पराडकर वाडी ग्रामीण / मुंबई मंडळाचे आयोजन 

संतोष कोत्रे l    लांजा :- मौजे रूण ग्रामविकास मंडळ मुंबई, ग्रामीण या मंडळाच्या वतीने आयोजित सासुरवाशीण गौरव अर्थात सन्मान मातृत्वाचा” हा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी १४८ सासुरवाशिणींचा त्यांच्या कुटुंबातील पुरुषांकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

तालुक्यातील रूण पराडकर वाडीची श्री सत्यनारायण महापूजा अनेक सामाजिक उपक्रमासहित मोठ्या उत्साहात पार पडली. मंडळाचे वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा, माहेरवाशीण सन्मान सोहळा, वेगळ्या करिअर वाटा चोखळण्याऱ्या व्यावसायिक उद्योजकांचा सन्मान सोहळा, रक्तदान शिबिर, स्नेहमेळावा, स्वच्छता अभियान अशा अनेक उपक्रमांचा यात समावेश आहे. बिघडत चाललेली कुटुंब व्यवस्था आणि बदलणाऱ्या काळाची चाहूल घेत उपक्रमांचे नियोजन केले जाते.

या वर्षी “सासुरवाशीण गौरव अर्थात सन्मान मातृत्वाचा” हा सोहळा उपस्थित सर्वांच्याच मनात घर करून गेला. आई हे देवाचे रूप समजून आणि आजच्या काळातील कुटुंब व्यवस्थेत तिचे ढासळत असलेले स्थान विचारात घेऊन या गौरव सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. पराडकर वाडीतील जवळपास १४८ सासुरवाशिणींचा त्यांच्या कुटुंबातील पुरुषांकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अनेक माउलींनी ही भावना शब्दात बोलून दाखवत आम्ही भाग्यवान आहोत अशा शब्दांनी संकल्पनेचे कौतुक केले.

त्याचप्रमाणे वाडीच्या जडणघडणी मध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारे कै. श्री. लवू शंकर पराडकर याना मरणोत्तर वाडीरत्न हा पुरस्कार देण्यात आला. पराडकर वाडी शाळेतून निवृत्ती स्वीकारणाऱ्या आणि लहान मुलांना अतिशय उत्तम ज्ञान दान देणाऱ्या शिक्षिका सौ क्षमा रमेश पराडकर यांचा साडी चोळी आणि मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला,तसेच वाडीतील आणि गावातील प्रत्येक धार्मिक उपक्रमात नेहमी उपस्थित राहून सामाजिक बांधिलकी जपणारे उमाजी पूनाजी पराडकर यांचा सुद्धा विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले. समस्त महिलांच्या वतीने ही संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर पराडकर यांना पुषपगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन राजन सुर्वे यांनी केले. या निमित्ताने अजंठा प्रकाशित सप्तर्षी प्रोडक्शन मुंबई या नाट्य संस्थेचे दत्ता केशव लिखित आणि अरविंद रूणकर दिग्दर्शित “माझा कुणा म्हणू मी” या नाटकाचा दुहेरी रंगमंचावरील प्रयोग सादर करण्यात आला. वाडी प्रमुख भरत पराडकर आणि वाडीतील प्रत्येकाने हा सोहळा अविस्मरणीय करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले.