खेड(प्रतिनिधी)
सीएसएमटी-मुंबई रेल्वे स्थानकातील बारा डब्यांच्या एक्सप्रेससाठी १० आणि ११ क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्याचे काम १७ मेपासून हाती घेण्यात आले आहे. यासाठी सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या ४९ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होत आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. २ जूनपर्यंत हा मेगाब्लॉक सुरू राहणार असल्याने चाकरमान्यांना इच्छितस्थळ गाठताना यातायात करावी लागत आहे.
कोकण रेल्वे मार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येत आहे. अडीच ते तीन तासांच्या मेगाब्लॉकमुळे २ ते ३ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर केले आहे. प्रत्यक्षात मात्र ७ ते ८ गाड्या विलंबाने धावत आहेत. त्यात परत सीएसएमटी-मुंबई स्थानकातील फलाट विस्तारीकरणाच्या कामासाठी १७ मे पासून सुरू असलेल्या मेगाब्लॉकची भर पडली आहे. या मेगाब्लॉकचा कोकण रेल्वेगाड्यांच्या सेवांवर विपरित परिणाम झाला आहे. बहुतांश गाड्या दादर स्थानकापर्यंतच धावत आहेत तर काही गाड्या सीएसएमटी स्थानकाऐवजी दादर स्थानकातून सुटत आहेत. तुतारी एक्सप्रेस ठाणे स्थानकापर्यंत धावत आहे. २ जूनपर्यंत हा मेगाब्लॉक सुरू राहणार असल्याने कोकणवासियांना आणखी ४ दिवस इच्छितस्थळ गाठताना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.











