नंदूशेठ घाटे अबतक ८५…!

संतोष वायंगणकर

परोपकार आणि उदारता ही अंगी असावी लागते. श्रीमंत असणारी माणसं दानशूर असतीलच असं नाही. त्यासाठी मनाची श्रीमंती असावी लागते. संवेदनशील मन असावं लागत. आणि सामाजिक जाणीवा तितक्याच तीव्र असायला हव्यात तरच दुसऱ्यासाठी काही द्यायची आणि काही करायची मानसिकता असते. देवगडातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार व्यक्तिमत्व म्हणजे नंदूशेठ घाटे होय ! आज त्यांच्या वयाला ८५ वर्षे पूर्ण झाली. माझी नंदूशेठ घाटेंची पहिली ओळख आणि भेट ही माजी आमदार स्व.राजाभाऊ मिराशी यांच्यामुळे झाली. ९० च्या दशकात मी दै. तरूण भारतचा प्रतिनिधी म्हणून देवगडमध्ये होतो. इळये येथील वीजमंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जायचे होते. त्यावेळी राजाभाऊ मिराशी एमएसईबी बोर्डमेंबर होते. ते मला नंदूशेठच्या निवासस्थानी घेऊन गेले. त्यानंतर अगदी देवगड सोडेपर्यंत नेहमीच संपर्क होता. फारसं शिक्षण घेऊ न शकलेला परंतु स्वत:च्या कष्टाने सारं उभं करू शकणारा एक समाजकार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. देवगडात ग्रामपंचायत असेपर्यंत नंदूशेठ घाटे कायम ग्रा.पं. सदस्य राहिले. बाळासाहेब ढोके सरपंच आणि नंदूशेठ घाटे सदस्य असा तो ग्रामपंचायतीचा कारभार असायचा. काँग्रेसी विचारधारेतील नंदूशेठ घाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी त्यांचा वैयक्तिक स्नेह होता. राजकारणातील त्यांच्या मर्यादा त्यांना माहित असल्याने परिश्रम घेऊन व्यवसाय आणि व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून समाजकार्य करायचे अशीच त्यांची पद्धती होती. आजच्या इतकं देवगड विकसित झालेलं नव्हत. आंबा आणि मासळी यामुळे देवगडात आर्थिक सुबत्ता होती. परंतु त्यापलिकडे जाऊन देवगड विस्तारलेले देखिल नव्हतं. ठराविक वेळेनंतर देवगडात काही मिळेल अशी स्थिती नव्हती. आंबे, मासे त्या हंगामापुरताच देवगडच्या बाजारात थोडीसी वर्दळ होती. आज देशभरातील पर्यटक पर्यटनासाठी येतो. पर्यटनातल्या बदलाची किमया आ.नितेश राणे यांनी घडविली. मी पत्रकारीतेत देवगडला असताना राजकारणात, समाजकारणात, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी अनेक माणसं भेटत गेली. स्नेहही निर्माण झाला. आणि तो आजही तसाच टिकून राहिला. नंदूशेठ घाटेमधला परोपकारी माणसाच त्याकाळी अनेकवेळा दर्शन घडलं. असाच एकदा बातमीच्या निमित्ताने पडेल, विजयदुर्ग भागात गेलेलो, डॉ.सोडल तेव्हा पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळची पत्रकारीतेत न्यूज सोर्स हे एसटी बस स्टॅण्ड, पॉपकार्न सेंटर, आरोग्य केंद्र, रिक्षा स्टॅण्ड, एस.टी. कँटिन अशा जागा असायच्या. त्यामुळे विजयदुर्ग भागात गेल्यावर पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणं आणि डॉ.सोडल यांच्याशी गप्पा मारून देवगड गाठावे. असाच एकेदिवशी संध्याकाळी जाणं झालं. डॉ.सोडल धावपळीत होते. मला म्हणाले, एक म्हातारी ॲडमिट झाली आहे. मी उपचार करतोय पण थोडी औषधं बाहेरून मागवावी लागणार, तिच कोणीच नाही आहे. मी म्हटलं ठिक आहे, कोणाला सांगून पाहू. मी देवगडला येताच नंदूशेठ घाटेंना त्या म्हातारीची कैफियत सांगितली. त्यांनी त्या म्हातारीच्या उपचारासाठी लागणारी सर्व औषधे पाठवली. ती म्हातारी पूर्ण बरी होऊन आपल्या घरी गेली. त्याकाळी वर्तमानपत्राचे कार्यालय हे सर्वसामान्य, गोरगरीबांना आधार वाटाव असं हक्काच ठिकाण असायच. पत्रकारीताही त्याच सामाजिक जाणीवेने व्हायची. त्यामुळे असाच १०वी, १२वी चा निकाल लागला की पाच-दहा विद्यार्थी-विद्यार्थीनी आर्थिक परिस्थिती नसल्याने पुढील शिक्षण घेऊ शकत नसल्याने काही करता येईल का पहा असं सांगणारे यायचे. मग हमखास त्या विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य आणि त्यांची फी देखिल नंदूशेठ घाटे यांनी भरल्याची उदाहरण आहेत. जेव्हा बोलण व्हायच तेव्हा नंदूशेठ म्हणायचे, अहो माझ्या घरच्या त्यावेळच्या परिस्थितीमुळे माका शिक्षण घेवक मिळाक नाय. त्यामुळे जर शिक्षणाची कोणाची अडचण होव नये म्हणून मी मदत करतय. इतक्याच… त्या मदतीसंबंधी त्यांच्या भावना या अशा असायच्या. नंदूशेठ राजकारणात सक्रिय असायचे परंतु त्यांच राजकारण सकाळी १२ वाजेपर्यंतच त्यानंतर दुपारनंतर नित्यनियमाने देवगड भाटीवर असायचे. मच्छी व्यवसायात पूर्ण व्यस्त असायचे. १९९५ मध्ये देवगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. परंतु स्व.आमदार आप्पासाहेब गोगटे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे राजकारण हे आपल काम नव्हे असं ते नेहमीच म्हणत आले आहेत. तालुक्यातील शाळा, मंदिर उभारणीत नंदूशेठ घाटेंचा नेहमीच हात पुढे असायचा. अलिकडे देवगडला फार जाणं होत नाही. परंतु जेव्हा कधी देवगडला जातो तेव्हा अनेकांना भेटायचं असतं, त्यांच्याशी बोलायच असत, परंतु घड्याळ थांबत नाही आणि मग अनेकांना न भेटताच बोलताच देवगडच्या आठवणींमध्ये रमत कणकवली गाठावी लागते. एक छान सुसंस्कृतपणा असलेला तालुका म्हणून देवगडचा उल्लेख करावा लागेल !
देवगडात पत्रकारीता करत असतानाही पत्रकारीतेच पावित्र्य राखत त्याला कुठेही नख लागू न देताही आप्पासाहेब गोगटे, बाळासाहेब ढोके, अण्णा करंदीकर,माधवराव भांडारी, बाळा खडपे, काका राऊत, प्रि.आर.आर.लोके, जैन्नुदिनशेठ बगदादी, दादा आचरेकर, य.ह.वेलणकर अशा अनेकांशी जिव्हाळा आणि स्नेहसंबंध राहिले. या संवादात नेहमी जिव्हाळा आणि आपलेपणा होता. याचे कारण त्या स्नेहामध्ये नि:स्वार्थीपणा होता. नंदूशेठ घाटेंची अलिकडे भेट नाही. मात्र, १ जूनला वाढदिवसाची त्यांची तारीख आठवणीत होती. वयाची ८५ गाठणाऱ्या नंदूशेठना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो याच सदिच्छा !