पोलिसांकडून ग्रामस्थांच्या कामगिरीचे कौतुक,जागृत राहण्याचे आवाहन
तळवली | वार्ताहर : येथील तळवली ग्रामदेवता मंदिर परिसरात शनिवारी रात्री उशिरा सतत फेरफटका मारणाऱ्या दोन तरुणांना तळवली देऊळवाडी ग्रामस्थांच्या जागृतपणामुळे पकडण्यात यश आले.
शनिवारी रात्री उशिरा 10.30 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात तरुण तळवली ग्रामदेवता मंदिराकडे संशयितरित्या फेऱ्या मारताना दिसले.यावेळी मंदिराजवळ असलेल्या देऊळवाडी येथील जागृत ग्रामस्थांना या तरुणांच्या वागण्याचा संशय आल्याने त्यांनी वाडीतील तसेच गावातील ग्रामस्थांना याबाबत तत्काळ माहिती दिली. इतक्या उशिरा रात्री हे अनोळखी तरुण त्यांच्या दुचाकीवरून दोन तीन फेऱ्या मंदिरच्या दिशेने मारत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. सदर तरुणांची वागणूक संशयास्पद आढळून आल्याने ग्रामस्थांनी त्यांची सखोल विचारपूस केली. आपण मंदिरात दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी आलो होतो असे सदर तरुणांनी ग्रामस्थांना सांगितले,मात्र हे सर्व करायला रात्री का? अशी विचारणा केल्यावर हे तरुण उलट सुलट उत्तर देऊ लागले त्यानंतर ग्रामस्थांनी सदर घटना पोलीस पाटील व गावातील इतर ग्रामस्थांना सांगितली.या तरुणांची चौकशी केली असता हे सदरचे संशयित तरुण हे चोरीच्या उद्देशाने आले असावेत असे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.हे संशयित तरुण सोलापूर येथील असल्याची माहिती चौकशीमध्ये मिळाली.
अखेर ग्रामस्थांनी गुहागर पोलीस स्थानकात संपर्क करून त्या दोन तरुणांना स्वतः रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या ताब्यात दिले याबाबत अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.









