शेळीपालन करणाऱ्या कोमलचे दहावीत सुयश

खेड तालुक्यातील खवटीची सुकन्या

खेड (प्रतिनिधी) आर्थिक दुर्बलता पाचवीला पुजलेली असताना देखील सदैव जगण्याची जिद्द बाळगून इतिहास घडविणारे थोडेच असतात. त्यापैकीच एक असलेली
कोमल देवळेकर ही खेड तालुक्यातील खवटी गावात इयत्ता दहावीत ८०.४० टक्के गुण मिळवून चमकली आहे. कोणत्याही प्रकारची विशेष शिकवणी नाही, घरी आईला मदत करून शेळीपालन करणाऱ्या कोमलने आयुष्यात खूप शिकून यशस्वी होण्याची जिद्द मनी बाळगली आहे.

खेड तालुक्यातील खवटी गावातील विजय देवळेकर यांची ती कन्या होय. गवंडी काम करून कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या विजय यांचा कामावर असताना छोटा अपघात कोमलच्या जन्मापूर्वी झाला. या अपघातात पायाला गंभीर दुखापत होऊन
४० टक्के अपंगत्व आले. त्यातच अवघ्या सहा महिन्यांचा गर्भ असलेल्या कोमलचा जन्म झाला. पूर्ण वाढ न होता जन्म झालेल्या कोमलला तब्बल सहा महिने रुग्णालयात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवावे लागले. कोमलचे पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण खवटी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढील शिक्षण तिने न्यू इंग्लिश स्कूल खवटी येथे झाले. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन व त्यांनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन हा मूलमंत्र घेऊन कोमल आपली शैक्षणिक वाटचाल करत आहे. तिला उच्च शिक्षण घेतानाच, प्रोफेशनल ब्युटीशियन कौशल्य प्राप्त करायचे आहे.