सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तब्बल ३१ हजाराचे मताधिक्य मिळालेले असताना सावंतवाडी शहरात मात्र काठावरचे मताधिक्य मिळाले आहे. हे मताधिक्य घटण्यामागे एका विशिष्ट समुदायाचा हात आहे. मात्र, विरोधकांकडून जो अपप्रचार करण्यात आला तसेच मतांसाठी त्यांचा जो वापर करण्यात आला याबाबत त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नेमकी नाराजी काय याबाबत अभ्यास करून भविष्यात त्यांचे मतदान भाजपकडे पुन्हा आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील, असा विश्वास भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत माजी उपसभापती संदीप नेमळेकर, तळवणे सरपंच गोविंद केरकर, चराठा उपसरपंच अमित परब आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरात महायुतीची ताकद असताना लोकसभा निवडणुकीत शहरात मिळालेले मताधिक्य हा नक्कीच चिंतनाचा विषय आहे. केवळ याच मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण राज्यात व देशभरात अल्पसंख्यांक मतदारांचा बुद्धिभेद करून त्यांच्या मतांचा ज्याप्रमाणे एक गठ्ठा वापर करण्यात आला त्यामुळेच शहरात देखील ज्या भागात त्या मतदारांचे प्राबल्य आहे तिथे महायुतीला मोठा फटका बसला आहे. अल्पसंख्यांक बांधवांप्रमाणेच संविधान बदलाच्या विषयावरून दलित बांधवांची मते ही आपल्याकडे खेचण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. मात्र केवळ मतांसाठी त्यांनी केलेले राजकारण या सर्व मतदारांना लक्षात आणून देत त्यांची नेमकी नाराजी काय आहे याचा अभ्यास करून भविष्यात हे मतदार पुन्हा भाजपकडे आणण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू असा विश्वास संजू परब यांनी व्यक्त केला.
तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपची वाढलेली ताकद पाहता वरिष्ठांनी आदेश दिल्यास या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र हा निर्णय सर्वस्वी भाजपच्या वरिष्ठांचा असेल व ते जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.












