राणे संपले नाहीत …राणे जिंकले!

देशामध्ये एनडीए ला बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्रात सर्वांना आत्मपरिक्षण करायला लावणारा लोकसभा निवडणुकीतील निकाल आहे. महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात कोकणामध्ये महायुतीला चांगल यश मिळालं आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचे कोकणातील सर्व उमेदवार निवडून आले आहेत. ठाणे, रायगड, पालघर, कल्याण-डोंबिवली आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या सर्व लोकसभा मतदार संघात भाजपा, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश आले आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकणवासीयांनी नाकारले आहे.रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. कल्याण-डोंबिवली मतदार संघातून श्रीकांत शिंदे दुसऱ्यांदा लोकसभेत प्रतीनिधित्वासाठी जनतेला कौल दिला.

पालघरमधून भाजपचे हेमंत सावरा विजयी झाले.ठाणे जिल्हा उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचा बालेकिल्ला म्हटला जायचा. परंतु ठाणे मतदार संघातही शिवसेनेचे नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव करीत राणे संपले नाहीत तर राणे जिंकले.
कोकणातील एकाही लोकसभा मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेला विजय मिळवता आलेला नाही. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सातत्याने सांगत असत परंतु कोकणाने दाखवून दिले कोकण उबाठाचा नव्हता तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा कोकणचा मतदार आहे. यामुळेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट असलेल्या पूर्वाश्रमीच्या एका शिवसैनिकाला निवडून दिले आहे. महायुतीच्या कोकणातील लोकसभा निवडणुकीतील विजयाने कोकणात उध्दव ठाकरे शिवसेनेला जनतेने मोठा धक्का दिला आहे. कोकणवासीयांना या निवडणुकीत विकासावर चर्चा अपेक्षित होती. परंतु तशी विकासावर चर्चा करण्यातच आली नाही. फक्त टीकाटिप्पणी होत राहिली. या निवडणूक निकालाने कोकणातील राजकीय संदर्भही बदलले जाणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच एक वेगळ चित्र पाहायला मिळणार आहे.रत्नागिरी, राजापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाकडून दावा होऊ शकतो.मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना वरील दोन्ही विधानसभा निवडणुकीत मोठ मताधिक्य घेतल होत यावेळच्या लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या कार्यकर्त्यानी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवीन्द्र चव्हाण,माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध रित्या 2019च विनायक राऊत यांच असलेल मताधिक्य कमी करण्यात यश मिळाले आहे.रायगड मतदार संघातही सुनील तटकरे यांनी अनेकांचे अंदाज चुकवत विजयी होत दाखवून दिले आहे. पालघर लोकसभा मतदार संघात हेमंत सावरा यांना उमेदवारी देताना पूर्वीच्या खासदारांना थांबवले होते यामुळे अनेकांनी हेमंत सावरा निवडून येणार की नाही हि शंका घेतली होती. परंतु हेमंत सावरांनी विजय प्राण करीत कोकणातील भाजपाचे वर्चस्वही सिद्ध केले आहे. कल्याण-डोंबिवली मतदार संघात श्रीकांत शिंदे यांचा विजय निश्चित मावला जात होता. मात्र श्रीकांत शिंदे यांना पराभूत करण्याचे आडाखे उबाठा कडून आखले जात होते परंतु कल्याण-डोंबिवलीच्या जनतेने पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांच्या बाजूनेच कौल दिला आहे. तर ठाणे लोकसभा मतदार संघातून कोण निवडणूक लढवणार हे ठरत नव्हते. शिवसेनेचे रवींद्र फाटक, आ. प्रताप सरनाईक अशी नाव पुढे येत होती. मात्र शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवक, महापौर राहिलेल्या नरेश म्हस्के यांना या लोकसभेच्या निवडणुकीत उतरविले आणि महायुतीच्या नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदार संघातील मतदारांनी विजयी केले. ठाणे जिल्हा हा शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या बालेकिल्ला असण्याचा दावा केला जात होता. मात्र नरेश म्हस्केना निवडून देत ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असण्याचे सिद्ध केले आहे.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भाजपा महायुतीचे नारायण राणेच विजयी होतील हा राजकीय निरीक्षकांना विश्वास होता. परंतु राणे विरोधकांकडून सातत्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे संपले म्हटले जायचे परंतु या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील जनतेने नारायण राणे यांच्या बाजूने कौल देत राणे विरोधकांना गप्प केले आहे. महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवी समोर जत्रेदिवशी यावेळच्या लोकसभा निवडणूकीत आपल्या समोर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून नारायण राणे च असावेत म्हणून गारान्ह घातले.विनायक राऊत यांच्या नवसाला देवी भराडी पावली. आणि नारायण राणे उमेदवारी दिली गेली.आणि नारायण राणे निवडून येण्यासाठी देवी भराडीचे कृपादृष्टी आणि आशिर्वादही लाभले.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नारायण राणे राजकारणातून संपले म्हणणाऱ्यांना नंतरच्या काळात ज्या पद्धतीने नारायण राणे विधानपरिषद, राजसभासदस्य, केंद्रीयमंत्री या पदांवर काम करत राहिले तरीही राणेंचे सिंधुदुर्गात काहीच नाही अस सातत्याने जी बोलणारी आणि विरोधासाठी विरोध करणारे विरोधक होते. त्या सर्वांना कोकण, सिंधुदुर्ग पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोकणातील जनता आजही नारायण राणे यांच्यावर तितकाच विश्वास आणि प्रेम करते हे देखिल लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने दाखवून दिले आहे. राणे कधीच संपले नाही. तर एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे ते नेहमी नव्या उमेदीने लोकांसमोर जात राहिले. आणि कोकणातील जनतेनेही कधी रुसवा व्यक्त केला असला तरीही अवघ कोकण हे राणेंचच आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याने तर ठरवलेलच कोणीही कितीही आणि कसही पराभूत करायच ठरवलेल असल तरीही राणेंना विजयी करायचच हा जनतेने चंगच बांधला होता. राणे संपले म्हणणार्याना समजून आल असेल राणे संपले नाहीतच राणे जिंकलेच.