ग्रामसभेत मारली डोक्यावर खुर्ची ; मुणगे येथील घटना

देवगड (प्रतिनिधी): मुणगे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत पुर्ववैमनस्याचा रागातुन सभेला बसलेल्या दिगंबर राजेंद्र महाजन (३५) रा.मुणगे वाघोळीवाडी यांच्या डोक्यावर खुर्ची मारून जखमी केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरूवार ६ जून रोजी १२.१५ वा.सुमारास मुणगे ग्रामपंचायत कार्यालयात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुणगे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गुरूवार ६ जून रोजी ग्रामसभा होती. या ग्रामसभेमध्ये दिगंबर राजेंद्र महाजन बसले होते. सभेतील मनोज सखाराम सावंत(३८) व त्यांचे सहकारी योगेश प्रकाश सावंत (४०) व प्रकाश शिवाजी सावंत (६०) रा.मुणगे सावंतवाडी यांनी पुर्ववैमनस्याच्या रागातून अचानक महाजन यांच्या डोक्यावर खुर्ची दोनवेळा घातली. यामुळे त्यांच्या डोक्याला डाव्या बाजुला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत महाजन यांनी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मनोज सखाराम सावंत, योगेश प्रकाश सावंत व प्रकाश शिवाजी सावंत या तिघांविरूध्द भादवि ३२४,३२३,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर कदम करीत आहेत.