डोंगरचे माजी सरपंच दीपक शेलार यांचा आरोप
राजापूर | प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी कोळसावाहू ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघतात एकाला आपला प्राण गमवावा लागला तर दहा जण जखमी झाले. या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरिल या अपघातग्रस्त ठिकाणाचा व महामार्गावर थाटल्या गेलेल्या अनधिकृत टपऱ्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. या ठिकाणी सुरक्षिततेबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, महामार्गावर कुठेही व कशा प्रकारे टाकल्या जाणाऱ्या अनधिकृत टपऱ्यांकडे लक्ष द्यावे अशी वारंवार मागणी करूनही व तक्रार करूनही महामार्ग विभाग व स्थानिक प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज अशा प्रकारे अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागत असल्याचा आरोप डोंगर गावचे माजी सरपंच दीपक शेलार यांनी केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कोंढेतड आणि डोंगरतिठा येथील रस्ता आधीच तीव्र उतार आणि वळणांचा आहे. या ठिकाणी मुंबईकडून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी वाहने, त्याचवेळी कोंढेतडच्या बाजूने डोंगरतिठा येथे जाण्यासाठी डावीकडून उजवीकडे वळणारी वाहने आणि त्याचवेळी जुन्या रस्त्याने शहरामध्ये जा-ये करणारी अशा विचित्र स्थितीची त्यामध्ये भर पडली आहे. त्यातून, या ठिकाणी अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने महामार्गावरील कोंढेतड आणि डोंगरतिठा येथील रस्ता प्रवासासाठी ‘डेंजर झोन’ ठरताना दिसत आहे. तर महामार्गावर अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या टपऱ्या देखील अपघातांना निमंत्रण देत आहेत.
शहरानजीकच्या कोंढेतड येथून मुंबई-गोवा महामार्गावरून विविध भागामध्ये जाणारे मार्ग वा रस्ते आहेत. त्यामध्ये या भागामध्ये वाहनांसह लोकांची नेहमीच वर्दळ अन् गर्दी असते. कोळशाच्या ट्रकने दुचाकी उडवित क्वालिस गाडीला दिलेल्या धडकेतून झालेल्या अपघाताने कोंढेतड गाडगीळवाडी येथील महामार्गावरील ठिकाण धोकादायक असल्याचे प्रकर्षाने पुन्हा एकदा पुढे आले आहे.
महामार्गवरील कोंढेतड गाडगीळवाडी येथील परिसर वळणाचा आणि उताराचाही आहे. अर्जुना नदीवरील सर्वाधिक उंचीचाच पूल पार करून मुंबईकडून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगाने धावणार्या वाहनांना येथील नागमोडी वळणांचा झपकन फारसा अंदाज येत नाही. त्याचवेळी डोंगर, विल्ये, जैतापूर आदी भागांमध्ये जाणारी वाहने मोठ्या पूलावरून रस्त्याने येत पुढे कोंढेतडच्या बाजूने डोंगरतिठा येथे जाण्यासाठी त्यांना महामार्ग पार करून डावीकडून उजवीकडे वळावे लागते. त्याचवेळी या भागातील पूर्वीच्या जुन्या रस्त्याने शहरामध्ये जा-ये करणार्या वाहनांचीही वर्दळ असते. शहराच्या दिशेने जाणार्या पूर्वीच्या जुन्या रस्त्याच्या येथे कोणताही माहितीफलक वा दिशादर्शक फलक लावलेला नसल्याने गोव्याकडून मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या वाहनाला डोंगरतिठा येथे आल्यानंतर नेमके कुठल्या रस्त्याने जायचे ? असा प्रश्न निर्माण होतो. दोन वर्षापूर्वी कोंढेतडच्या बाजूने डोंगरतिठा येथे जाणाऱ्या दुचाकीला महामार्गावरून भरधाव येणार्या वाहनाची धडक बसून अपघात झाला होता. त्यामध्ये एकाला जीवही गमवावा लागला होता. या साऱ्या कोंढेतड गाडगीळवाडी आणि डिोंगरतिठा परिसरातील विचित्र स्थितीमध्ये अपघाताला निमंत्रण मिळताना दिसत आहे. त्यातून, हा परिसर प्रवासासाठी डेंजर झोन ठरताना दिसत आहे. यावर दिशादर्शक वा रस्त्याची माहिती देणारा फलक यांसारख्या वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यामध्ये या परिसरात वारंवार अपघात होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही.
याबाबत आपण वारंवार महामार्ग विभागाकडे लेखी पत्र देऊन तक्रारी केल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले. या परिसरात वारंवार होणारे अपघात पहाता, व बुधवारी झालेल्या भिषण अपघाताची गंभीरता लक्षात घेता आता तरी प्रशासन या ठिकाणी काही उपाययोजना करणार आहे की नाही असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.











