माउंट एवरेस्ट वर अद्यापही 200 मृतदेह पडून… नेपाळ आर्मीचा खुलासा

वी दिल्ली : एक काळ असा होता, की जगातलं सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी व्यक्ती एवढी प्रसिद्ध व्हायची की तिच्यावर आपल्या देशातच नव्हे तर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असे. या कारणास्तव, बचेंद्री पाल, अवतार सिंग चीमा, एडमंड हिलरी आणि तेंगजिंग नोर्गे यांसारख्या लोकांची नावं आजही प्रसिद्ध आहेत.

या व्यक्तींनी सर्वांत सुरुवातीच्या काळात माउंट एव्हरेस्ट सर केलं होतं. मात्र आता हा पर्वतदेखील पर्यटनस्थळ बनला आहे. जगभरातले अनेक लोक यावर चढाई करण्यासाठी पायथ्याशी येतात. परिणामी माउंट एव्हरेस्ट कचराकुंडी बनत चालला आहे.

नुकतीच नेपाळी लष्कराने एव्हरेस्टची स्वच्छता केली आहे. नेपाळी लष्कराने माउंट एव्हरेस्ट आणि हिमालयातल्या इतर दोन शिखरांवरून 11 टन कचरा काढला. या कचऱ्यात सापडलेल्या वस्तू पाहून धक्कादेखील बसू शकतो. बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नेपाळी लष्कराने दावा केला आहे, की त्यांनी माउंट एव्हरेस्टवरून 11 टन कचरा काढला आहे. या कचऱ्यामध्ये त्यांना चार मृतदेह आणि एक मानवी सांगाडाही सापडला आहे. याशिवाय, हिमालयातली इतर दोन शिखरंही स्वच्छ करण्यात आली आहेत.

माउंट एव्हरेस्ट, नुपसे आणि लोहसे या शिखरांवरचा कचरा काढण्यासाठी लष्कराला 55 दिवस लागले. असा अंदाज आहे की, माउंट एव्हरेस्टवर अजूनही 50 टन कचरा आणि 200 हून अधिक मृतदेह पडलेले आहेत.

सर्वांत उंच डंपिंग क्षेत्र
नेपाळी लष्कराने आपल्या वार्षिक स्वच्छता मोहिमेनुसार माउंट एव्हरेस्टची स्वच्छता केली. 2019मध्ये माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वांत उंचीवरचं कचरा टाकण्याचं ठिकाण मानलं गेलं. कारण, दिवसेंदिवस पर्वतावर येणाऱ्यांची गर्दी वाढत होती. आतापर्यंत पाच स्वच्छता मोहिमा राबवलेल्या नेपाळी लष्कराचा दावा आहे, की त्यांनी आत्तापर्यंत 119 टन कचरा, 14 मानवी मृतदेह आणि काही सांगाडे शोधले आहेत. यंदा प्रशासनाला माउंट एव्हरेस्टवरचा कचरा कमी करायचा आहे. त्यामुळे काही काळापूर्वी प्रशासनाने नियम केला आहे, की गिर्यारोहणासाठी जाणाऱ्यांनी खाली येताना आपली विष्ठा सोबत आणावी.

या वर्षी गिर्यारोहकांची संख्या कमी
वसंत ऋतूतला गिर्यारोहण हंगाम मेमध्ये संपतो. गेल्या वर्षी 478 लोकांनी या पर्वतावर चढाई केली होती. या वर्षी सरकारने 421 जणांना पर्वत चढण्याची परवानगी दिली होती. यामध्ये नेपाळी गाइडच्या संख्येचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यांची आकडेवारी विचारात घेतली तर सुमारे 600 जणांनी यंदा एव्हरेस्टवर चढाई केली आहे. या वर्षी आठ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला किंवा ते बेपत्ता झाले. गेल्या वर्षी ही संख्या 19 होती.