खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महाड हद्दीतील नडगाव गावाजवळ खोदकामातील दरड मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे शनिवारी सायंकाळच्या सुमारास कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. अखेर प्रशासनाने अथक प्रयत्नाने जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला हटवल्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत होताच वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास
टाकला.
शनिवारी दुपारनंतर महाड तालुक्याला पावसाने झोडपले. सलग तीन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नडगावनजीक अचानक दरड कोसळली. सुदैवाने दरडीमुळे कोणत्याही स्वरूपाची हानी झाली नसली तरी डोंगरातून आलेल्या दगडांमुळे महामार्ग काही काळ बंद ठेवावा लागला. रूंदीकरणाचे काम करत असताना मुसळधार पावसामुळे कोणत्याही स्वरूपाचा अपघात होणार नाही, याची खबरदारी महामार्ग खात्याने न घेतल्यामुळेच कोसळलेल्या दरडीमुळे वाहनचालकांची कोंडी झाली. रायगड जिल्ह्यातील माणगावनजीकही डोंगर फोडून रुंदीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी देखील दरडी कोसळण्याचा धोका कायमच आहे.











