३१ऑक्टोबरपर्यंत राहणार वेळापत्रक
खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावर १० जूनपासून वेळापत्रकाची
पावसाळी अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल देखील झाला आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात आल्याने प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळणे, चिखल मातीसह पावसाचे पाणी मार्गावर येवून वाहतूक विस्कळीत होणे, अशा बाबी लक्षात घेत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन कोकण मार्गावर १० जून ते ३१ ऑक्टोबर याकालावधीत पावसाळी वेळापत्रकानुसार रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन करते.त्यानुसार रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करावा लागतो.
या पावसाळी वेळापत्रकानुसार कोकण मार्गावर आठवड्यातून ६ दिवस धावणारी वंदे भारत एक्सप्रेस यापुढे ३ दिवस तर ५ दिवस धावणारी तेजस एक्सप्रेसही सोमवारपासून ३ दिवस धावणार आहे.
पावसाळी वेळापत्रकानुसार कोकण मार्गावरून धावणारी कोकणकन्या एक्सप्रेस मडगाव येथून सकाळी ६ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. वंदे भारत एक्सप्रेस मडगाव येथून दुपारी १२.३० वाजता सुटून रात्री १०.३५ वाजता सीएसएमटी मुंबई येथे पोहचेल.
जनशताब्दी एक्सप्रेस मडगाव येथून सकाळी १२ वाजता सुटून रात्री ११.५५ वाजता सीएसएमटी मुंबई येथे पोहचेल. मांडवी एक्सप्रेस सकाळी ८.३० वाजता सुटून रात्री ९.४५ वाजता सीएसएमटी मुंबई येथे पोहचेल.
मडगाव-एलटीटी एक्सप्रेस मडगाव येथून सकाळी ११ वाजता सुटून रात्री ११.३५ वाजता एलटीटीला पोहोचेल. तेजस एक्सप्रेस सुटून रात्री १२.२० मडगाव येथून दुपारी १२.५० वाजता वाजता सीएसएमटी मुंबई येथे पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस रात्री ११ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता मडगाव येथे पोहचेल.
वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकातून सकाळी ५.२५ वाजता सुटून दुपारी ३.३० वाजता मडगाव
येथे पोहोचेल. जनशताब्दी एक्सप्रेस सीएसएमटी मुंबई स्थानकातून सकाळी ५.१० वाजता सुटून सायंकाळी ४.३० वाजता मडगाव येथे पोहचेल. मांडवी एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकातून सकाळी ७.१० वाजता सुटून रात्री ९.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. मडगाव-एलटीटी एक्सप्रेस एलटीटी येथून रात्री १२.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता मडगाव येथे पोहचेल. तेजस एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकातून सकाळी ५.५० वाजता सुटून सायंकाळी ५ वाजता मडगाव येथे पोहचेल. पावसाळी वेळापत्रकानुसार धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागत असल्याने ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवाशांची डोकेदुखी कायम राहणार आहे.










