नगर पंचायतीसह महामार्ग अधिकारी व ठेकेदार यांची चालढकल
संतोष कोत्रे | लांजा :- पावसाला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात पुन्हा एकदा गतवर्षीची परिस्थिती निर्माण होऊ नये यादृष्टीने लांजा नगर पंचायतीने पावसाळ्यापूर्वी गटार खोदाई करून शहरात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित होते.मात्र न.पं. बरोबरच मुंबई गोवा महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांनी देखील याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न जैसे थे आहे.
दरम्यान, हा प्रश्न मार्गी न लागल्यास प्रसंगी व्यापारी वर्गाला सोबत घेऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे कामाला सुरुवात होऊन अनेक वर्षे झाली तरी लांजा शहरातील काम रखडले आहे. तर महामार्गाच्या दुतर्फा गटारें नसल्याने पावसाळ्यात मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो. गटारांअभावी शहरात दुकानांसमोर पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. तर महामार्गावरुन वाहणारे पावसाचे पाणी गटारा नसल्याने थेट व्यापार्यांच्या दुकानात घुसते.
लांजा शहरात गटारांचा प्रश्न गेली अनेक वर्षे खितपत पडून आहे .लांजा ग्रामपंचायत नगरपंचायत म्हणून अस्तित्वात आल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यापारी वर्गाला होती .मात्र नगरपंचायतीची दुसरी टर्म म्हणजे दहा वर्षे पूर्ण होत आली तरी लांजा शहरातील गटारांचा प्रश्न हा मार्गी लागलेला नाही. गेले काही वर्षे याबाबत नगरपंचायत कडे सातत्याने पत्रव्यवहार करून देखील नगरपंचायतीकडून चालढकल करण्यात येत असल्याचे व्यापार संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी सांगितले.
सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महामार्गाच्या दुतर्फा गटार खोदाई करावी. साधारणपणे दोन ते तीन फुटापर्यंत गटारे खोदावीत.जेणेकरून पावसाळ्यातील पडणारे पाणी या गटारातून वाहून जाण्यास मदत होईल. यादृष्टीने नगरपंचायत तसेच महामार्ग अधिकारी व ठेकेदार यांनी याबाबत कार्यवाही करावी आणि व्यापारी वर्गाची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रसन्न शेट्ये यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे हा प्रश्न मार्गी न लावल्यास प्रसंगी व्यापाऱ्यांसोबत मुंबई गोवा महामार्गावर उतरण्याचा इशारा देखील दिला आहे.











