कोतवडेच्या माळावर गावकर्‍यांची ‘गाववाफ’

तांदळाच्या भाकर्‍या, कुलदाच्या उकडीवर ताव

बा देवा, शेता-भाताची भरभराट व्होवदेे!
खोबर्‍या-भाताचा निवेद गोड मानून घे!!
कोतवडेच्या माळावर सर्जनशीलतेची पूजा करणारी ‘गाववाफ’ परंपरा

रत्नागिरी : ‘बा देवा, चार व्हयवाटीच्या देवा, आज बालगोपाल मिलून, सालाबादपरमानं तुला नारल तुला देतावं हाय.. वल्या खोबर्‍या-भाताचा निवेद देतावं हाय, ता मान्य करून घे, अनी पोरां-बालांसगट, गुरां-ढोरा, मुला-मानसानत सुकसंपत्ती दे.. पावसा-पान्याची, शेता-भाताची भरभराट व्होवंदे..’ असे खणखणीत गार्‍हाणे घालून कोतवडे गावातील धामेळेवाडीत ‘सजर्नशीलतेचा उत्सव’ असलेली अनोखी ‘गाव-वाफ’ परंपरा धामेळेच्या माळावर पार पडली. यावेळी तांदळाच्या लुसलुशीत भाकर्‍या, भात आणि कुलथाची उकड असा अशा अत्यंत चविष्ट प्रसादाचा सार्‍या गावकर्‍यांनी मिटक्या मारत आस्वाद घेतला.
कोकणात जितके सण तितक्या त्या सणाच्या विविध प्रथा आणि परंपरा… याच प्रथा-परंपरांनी इथली लोकं समृध्द बनलेली, आणि एकमेकांशी घट्ट एकोप्याने बांधून ठेवलेली.. कोकणातली शेती हीसुध्दा एकप्रकारचा उत्सवच! त्यामुळे या शेतीच्या उत्सवात प्रथा नसतील तर नवलच.. अशीच कोकणातील विशेषत: रत्नागिरी तालुक्यातील शेतकरी वर्गाची सर्वांग सुंदर आणि सर्जनशीलतेची पूजा करणारी प्रथा म्हणजे गाववाफ!
सर्जनशीलतेची पूजा
मृग नक्षत्र लागले, की कोकणात भाताचा पेरा होतो.. कधीकधी त्याआधीही धुळवाफेचा पेरा पडतो. काहीच दिवसात राब रूजून येतो, आणि सर्वत्र माळरानावर हिरवे ताटवे दिसू लागलात. एक बी जमिनीत टाकावे.. त्यावर मेघाचे पाणी पडावे, आणि ते बीज रूजून यावे, आणि त्यावर पुन्हा धान्य धरावे.. हीच सृष्टीही सर्जनशीलता शेतकर्‍यांनी अत्यंत श्रध्दाभावनेने पाहिली, आणि तीला त्याने ईश्वरी चमत्काराचे रुप मानले, आणि त्या सर्जनशीलतेची पुजा केली. ..ही पुजा म्हणजेच गाववाफ!
गाववाफ ते नवरात्रोत्सव
वाफ म्हणजे रुजलेल्या भाताचा वाफा.. पावसाच्या आगमनाने रुजलेल्या वाफ्याप्रती सार्‍या गावाने मिळून केलेली कृतज्ञता म्हणजेच गाववाफ! ही प्रथा अतिशय जूनी. गाववाफ आणि नवरात्रोत्सवातील घट यात साधर्म्य पहायला मिळते. गावावाफेला शेताची रुजवात करणार्‍या निसर्गदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त होते, तर नवरात्रोत्सवा ओले घट स्थापन करून त्यातून रुजलेल्या वाफ्याची नऊ दिवस स्थापना होते. यातून शेतकरी बांधवांमध्ये नवनिर्मिती, प्रजनन या गोष्टीला किती अनन्यसाधारण महत्व आहे, हे दिसून येते.
माळरान गाठले
गाववाफ अर्थात सर्जनशीलतेची पूजा करणारी ही परंपरा रविवार दि.9 जून रोजी रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावातील धामेळेवाडीच्या माळावर पार पडली. गावकर्‍यांनी सार्‍या तयारीनिशी माळरान गाठले. तेथे असलेले स्थानावर जागा-जुगा साफसुफ केली, आणि सगळे एकजुटीने कामाला लागले.
भाकर्‍या थापल्या
कुणी झपाझप जाऊन ती दगडांची चुल मांडली… कुणी लाकुडफाटा गोळा केला… कुणी भाताचा टोप चढवला.. कुणी गावठी कुळदासाठी आदणं लावलं.. आणि सर्वात मोठं काम भाकर्‍या थापणं.. त्यासाठी सार्‍याजणांचा थवा बसला, आणि काहीवेळातच पांढर्‍याधोट, लुसलुशीत शेकडो भाकर्‍या थापून, खुशखुशीत भाजून तयार झाल्या.
निसर्गदेवतेला आवाहन
त्यानंतर गावकरी मंडळी स्थानावर पुजेला लागली. स्थानदेवतेला, निसर्गदेवतेला आवाहन केलं गेलं. तीच्यापुढे नारळ-विडा ठेवला. भात, भाकर्‍या, आणि कुलदाच्या उकडीचा खास नैवेद्य निसर्गदेवतेला ठेवला, आणि वाडीच्या गावकरांनी साद घातली.
खणखणीत गार्‍हाणे
सारे गावकरी धरतीला हस्तस्पर्श करून उभे राहिले. ‘बा देवा, आज व्हया टिकानी उबं र्‍हावनं, तुज्यासमोर तुजी बाल-गोपाल, लेकरा उबी हाय… सालाबादपरमानं, तुजा नारल-इडा तुला देलीला हाय.. ता मान्य करून घे.. पोरा-बालात, गुरां-ढोरांत, मुला-मानसात सुकसंपत्ती देस.. पैशा-अडक्यात, नोकरी-धंद्यात यास देस.. शेता-भातात बरकत देस.. तुज्या आशीरवादानं, भाताचा पेरा केलीला हाय.. तेला कोंबारा फुटलीला हाय, तेच्या पेरात ताकद भरून दान्यानं-दान पदरात घाल, अनी पावसा-पानयाची बरसात करून सोन्याची दिस दाकवं.. बरकत आन.. अनी संबाल कर रं बा राजा..’ असे खास खणखणीत गार्‍हाणे निसर्गशक्तीला घातले गेले.
माळरानावर वनभोजन
त्यानंतर सार्‍या महाप्रसादाचे गप्पा-गोष्टी मारत वनभोजन पार पडले. नुकत्याच पावसानं ओल्याचिंब, तजेलदार झालेल्या माळरानावर सार्‍या गावकर्‍यांची पंगत बसली. प्रत्येकाच्या पत्रावळीवर भाकर्‍या, भात, आणि कुलदाची उकड पडली, आणि मिटक्या मारत अनोख्या वनभोजन बेहद्द रंगले, अशी माहिती रोहन मांडवकर यांनी दिली.