पेरलेले धान्य उत्तम उगवल्याने शेतकरी समाधानी
पाऊस नसल्याने शेतीच्या कामांचा वेग मंदावला
चिपळूण ( वार्ताहर) : शेतकऱ्यांनी सूर्याच्या रोहिणी नक्षत्रावर पेरणीला सुरुवात केली. त्यानंतर मृग नक्षत्रात पडणाऱ्या हलक्या सरींच्या स्वरूपातील पावसामुळे पेरलेल्या धान्याला चांगले अंकुर फुटले आहेत. वाफसे उत्तम उगवल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र मृग नक्षत्रातील पावसाचे प्रमाण वाढत नसल्याने शेतीच्या कामात खोळंबा होत आहे. त्यामुळे बळीराजा पेरणी करून पावसाची वाट पाहत आहे.
कोकणातील शेतकरी खरंतर रोहिणी नक्षत्र सुरू झाल्यानंतर पेरणीला सुरुवात करतो. त्यामुळे मृग नक्षत्रात पडणाऱ्या पावसात त्या पेरलेल्या धान्याला चांगले अंकुर फुटतात . त्यांची जोमाने वाढ होते मृग नक्षत्रात पाऊस पडल्यास शेतीच्या कामांना वेग येतो. शेतकरी शेतीच्या कामांमध्ये सक्रियपणे काम करायला सुरुवात करतात.
मात्र सध्या मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर ऊन पाऊस असा पावसाचा पाठशिवनीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे शेतीच्या कामांचा खोळंबा होत आहे. पेरणी करून शेतकरी आता पुढील शेतीच्या कामांसाठी सज्ज आहे. मात्र अजूनही जमीन पूर्णपणे ओली होईल आणि शेत नांगरण्यासाठी उपयुक्त होईल असा पाऊस न पडल्यामुळे शेतीचे कामे अडून राहिली आहेत. तर दुसरीकडे चांगले वाफसे उगवल्याने शेतकरी समाधानी आहे.
काही वेळा जोरदार पाऊस पडला तर पेरलेले धान्य सुद्धा पाण्याबरोबर वाहून जाते आणि पुनश्च पेरणी करण्याची शेतकऱ्यांवरती वेळ येते. परंतु यावर्षी पेरणीनंतर उत्तम वाफसे उगवले आहेत. आता शेतीच्या पुढील कामांसाठी बळीराजा सज्ज झाला असून तो पावसाची वाट पाहत आहे. जर मृग नक्षत्रात पाऊस आवश्यक स्वरूपात पडला तर निश्चितच त्या रोपांची जोमाने वाढ होऊन भात लावण्याची कामे वेळेत होऊ शकतात. यासाठी मृग नक्षत्रामधील पाऊस पडणे गरजेचे आहे. यानंतर येणारे नक्षत्र आद्रा असून ते नक्षत्र सुध्दा शेतीसाठी उपयुक्त असून त्यामध्येही पाऊस पडणे गरजेचे आहे. त्यामुळे पेरणी करून बळीराजा पावसाची वाट पाहत आहे.












