वायरी मोरेश्वरवाडी येथील विक्रम तोडणकर यांचे घर : तळाशील होडी दुर्घटनेत बेपत्ता असलेले किशोर चोडणेकर हे विक्रम यांच्या बहिणीचे पती : तोडणकर कुटुंबीय चोडणेकर यांच्या घरी गेले असताना घडली दुर्घटना
मालवण | प्रतिनिधी : वायरी भूतनाथ मोरेश्वर वाडी येथील विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या राहत्या घरास मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत घरातील साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली. यात तोडणकर यांचे सुमारे चार लाख पेक्षा जास्त नुकसान झाले. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने घरात कोणीही नव्हते.
वायरी भूतनाथ येथील मोरेश्वरवाडी येथे विक्रम तोडणकर यांचे राहते घर आहे. तळाशील येथील होडी दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या किशोर चोडणेकर हे विक्रम यांच्या बहिणीचे पती असल्याने त्यांच्या घरी तोडणकर यांच्या कुटुंबातील सदस्य गेले होते. तर विक्रम तोडणकर हे घरास कुलूप लावून सहकाऱ्यांकडे गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. रात्री शॉर्ट सर्किटने घरास आग लागल्याचे बोलले जात आहे. आगीच्या ज्वाला दिसताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण बनले. संपूर्ण घर जळून खाक झाले.
या आगीत घराचे तसेच घरातील साहित्य एलईडी टीव्ही, लाकडी कपाट, फॅन, शेगडी, रोख २३ हजार ७०० रुपये, इतर कागदपत्रे व गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. प्रशासनाने पंचनामा केला.












