खेड(प्रतिनिधी)खेड शहरातील जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासह बेटे काढण्यासाठी २ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळताच अलोरे जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागातर्फे गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले आहे. दिवसाला नदीपात्रातून सुमारे १५० ते २०० ब्रास गाळ उपसा केला जात असून, आतापर्यंत ५ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या गाळ उपशामुळे यावर्षी खेड शहरातील पुराचा धोका टळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील जगबुडी नदीचे पात्र गाळाने भरल्याने पुराची टांगती तलवार कायम होती, जगबुडीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसून व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. याशिवाय नदीकाठच्या रहिवाशांची अपरिमित हानी होत होती. शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद बुटाला यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार योगेश यांच्याकडे गाळ उपसण्याची मागणी केली. त्यानुसार जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यास, बेटे काढण्यासाठी गाळ उपसण्यास, बेटे काढण्यासाठी २ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
त्यानंतर अलोरे जलसंपदा यांत्रिकी विभागातर्फे दोन पोकलेनच्या साहाय्याने दिवसाला जास्तीत जास्त २०० ब्रास गाळ उपसण्यात येत आहे. आतापर्यंत ५ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे. नदीपात्रातून उपसण्यात आलेला गाळ नगर परिषद हद्दीतील राखीव भूखंडावर टाकला जात आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टी होईपर्यंत गाळ उपसण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.










