खेड प्रतिनिधी :– खेड तालुक्यातील लवेल येथे असलेल्या बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलच्या डायलिसिस सेंटरला घरडा केमिकल्स लिमिटेडच्या सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत नव्या डायलिसिस मशीनची महत्त्वपूर्ण भर पडली आहे. या अत्याधुनिक डायलिसिस मशीनचे औपचारिक लोकार्पण घरडा कंपनीचे मुख्य व्यवस्थापक रामचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले.
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील डायलिसिस रुग्णांसाठी बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलमधील डायलिसिस सेंटर हे खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना येथे मोफत डायलिसिस उपचारांचा लाभ दिला जात असून, त्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे. यापूर्वी डायलिसिससाठी रुग्णांना मुंबई, कोल्हापूर किंवा अन्य दूरच्या शहरांमध्ये जावे लागत होते. या प्रवासात वेळ, खर्च आणि मानसिक ताण यांचा मोठा बोजा रुग्णांवर पडत होता. घरडा हॉस्पिटलमध्ये मोफत व नियमित डायलिसिस उपचार उपलब्ध झाल्याने रुग्णांचा हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. आता नव्याने उपलब्ध झालेल्या डायलिसिस मशीनमुळे उपचार क्षमतेत वाढ होणार असून अधिक रुग्णांना वेळेवर, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळणार आहे. त्यामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील डायलिसिस रुग्णांसाठी ही सुविधा अत्यंत दिलासादायक ठरत आहे. या लोकार्पण सोहळ्याला घरडा कंपनीच्या हेड ऑफिसमधील विनायक दळवी, घरडा फाउंडेशनचे गोपाल थंपी, विकास जाधव, घरडा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य एस. के. पाटील, डॉक्टर फिरोज पटेल, घरडा सीएसआर विभागाचे श्री बापूराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी घरडा केमिकल्सच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत आरोग्य क्षेत्रातील हे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.













