वेरवली बेर्डेवाडी धरण आणि धबधब्याखाली  जाण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून मज्जाव

 

 

मात्र तरीही आदेश धुडकावून पर्यटक, तरूणांचा धबधब्याकडे ओढा कायम

लांजा( प्रतिनिधी) जलसंपदा विभाग, कार्यकारी अभियंता यांच्याकडून वेरवली बेर्डेवाडी धरण प्रकल्प आणि धबधब्याकडे जाण्यासाठी २५ मे रोजीच मनाई आदेश आणि बंदी घालण्यात आलेली आहे. असे असले तरीही हा आदेश धुडकावून अनेक जण या धबधब्याकडे जात असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या राजापूर तालुक्यातील कळसवली येथील २६ वर्षीय तरुणाचा रविवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.यानंतर या ठिकाणच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याबाबत बेर्डेवाडी धरण प्रकल्प कार्यकारी अभियंता वैभव शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या धरण प्रकल्प आणि धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना यापूर्वीच मज्जाव करण्यात आलेला आहे. प्रकल्पाकडे जाणारा रस्ता देखील बंद करण्यात आला आहे. धरणाकडे जाणारे दोन्ही गेट बंद करण्यात आली असून त्या ठिकाणी धरण प्रकल्पाकडे जाणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्याच्या सूचनावजा फलक ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि याचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल सूचना फलक देखील या ठिकाणी जागोजागी लावण्यात आलेले आहेत.

तसेच याबाबत दिनांक २५ मे रोजी लांजा तहसीलदार यांच्याशी चर्चा करून तशी कार्यवाही करण्यात आलेली आहे. मात्र तरीही अनेक जण हे आदेश धुडकावून या धबधब्याकडे जात आहेत. त्यातून रविवार सारखी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.