मारहाण प्रकरणातील फरार युवक अखेर पोलिसांच्या ताब्यात

सावंतवाडी । प्रतिनिधी : आर्थिक देवघेवीतून इन्सुली येथील जंगलात नेऊन तिघांना विवस्त्र करीत मारहाण केल्याप्रकरणी फरार असलेल्या संदीप उर्फ बाबू नारायण गावडे (३६, रा. निगुडे ) याला मंगळवारी सावंतवाडी पोलिसांनी अटक केली. या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या अकरा जणांपैकी आठ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून अन्य दोघांवर येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आर्थिक देवघेवीच्या वादातून तिघा जणांना मुंबई गोवा राज्य मार्गावरील इन्सुली येथील जंगलात नेऊन त्यांना विवस्त्र करीत बेदम मारहाण करण्यात आली होती. यात दिपेश गणपत वरसगावकर (वय ४०, रा. सालईवाडा, मुळ रा. नेरुर-देऊळवाडी) याच्यासह योगेश आडणेकर (रा. कोलगाव) व मकरंद कुलकर्णी हे तिघेजण गंभीर जखमी झाले होते. उपचारानंतर यातील दिपेश वरसगांवकर याने सावंतवाडी पोलिसांत या घटनेबाबत माहिती देत संबंधिताविरोधात तक्रार दिली होती.

त्यानुसार सावंतवाडी पोलिसांकडून चौकशी करीत याप्रकरणी हेमंत सत्यवान वागळे (वय २९), विलास दत्तात्रय पोपकर (वय ५१), वृषाल विलास पोपकर (वय २२, तिघे रा. इन्सुली), अनिकेत अरुण परब (वय ३१), अरुण धोंडू परब (वय ५८, दोघे रा.चराठा), अनिकेत गुरुनाथ राऊळ (वय २३, रा. मळगाव), शुभम शिवप्रसाद शितोळे (वय २६, रा. सबनिसवाडा- सावंतवाडी), भिवा लक्ष्मण मुळीक (वय ३२), यशवंत भानुदास नार्वेकर (वय ४२), रामचंद्र लवू नाईक (वय ३१, रा.इन्सुली) संदीप उर्फ बाबू नारायण गावडे (वय ३६ रा निगुडे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आठ जणांना अटक करण्यात आली होती. तर संदीप उर्फ बाबू नारायण गावडे हा फरार होता.

दरम्यान, मंगळवारी त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. बुधवारी यातील अटकेत असलेल्या आठ जणांसह बाबू गावडे याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर अन्य दोघांवर येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे ते त्यांची तब्येत सुधारल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.