चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात केले प्रतिपादन!
चिपळूण (प्रतिनिधी ): आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. सतत बदल घडत आहेत. अशा काळात बदलांना सामोरे जाणारे आधुनिक शिक्षण आवश्यक आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी नवनव्या विद्या शाखांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. परिस्थितीशी मुकाबला करून आपण शिक्षण घेतल्यास परिस्थितीवर मात करता येते, असे प्रतिपादन चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी येथे केले.
चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण /मुंबई, शिक्षण समिती, चिपळूण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील बौद्ध समाजातील इयत्ता दहावी , बारावी , पदवी व पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या चिपळूणतील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात संस्थेचे स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी विचार मंचावर प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ समुपदेशक तथा व्यवसाय मार्गदर्शक भास्कर कदम सर, चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत भाई मुकादम, संस्थेचे स्थानिक सरचिटणीस संदेश पवार, उपाध्यक्ष नाना सावंत, बुद्धघोष अमरे, खजिनदार संतोष सावंत, सहचिटणीस तुकाराम सपकाळ, सहचिटणीस प्रमोद कांबळे, तसेच माजी उपाध्यक्ष व साहित्यिक राष्ट्रपाल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने तालुक्यातील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आमदार शेखर निकम आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संविधानिक तरतुदी केल्यामुळे समाजातील दीनदुबळ्या, वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे झाले आहे . शासनाच्या अनेक योजना, शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. म्हणजे आपली परिस्थिती निश्चितपणे आपल्याला बदलता येते, असे सांगून नवनव्या क्षेत्रांचा अभ्यास करावा, असे सांगून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव आपण प्रयत्नशील राहू असे सांगितले.
तर प्रमुख मार्गदर्शक समुपदेशक भास्कर कदम यांनी विद्यार्थ्यांना करियर विषयक मार्गदर्शन करताना इयत्ता दहावी आणि बारावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात आपल्याला करिअर करता येईल ? याबाबतचे अनेक विविध मार्ग सांगितले. आपल्या दीर्घ भाषणात त्यांनी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची माहिती दिली. तसेच वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा, कॉलेजेस आणि त्यासाठी असणाऱ्या शासनाच्या सवलती यांचाही मागोवा त्यांनी आपल्या भाषणात घेतला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांचे शंका समाधान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी सत्काराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी संस्था वेळोवेळी काम करत असते याकडे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे आमदार शेखर निकम यांच्याकडूनही संस्थेला वेळोवेळी सहकार्य लाभ होत असल्याचे नमूद करून संस्थेच्या कामाची माहिती दिली. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन केले. यावेळी संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, चिटणीस सुहास पवार, हिशेब तपासणीस दिवाकर जाधव, धम्म कमिटीचे अध्यक्ष अनंत पवार, चिटणीस मनोहर कदम, न्यायदान कमिटीचे अध्यक्ष दिलीप मोहिते, चिटणीस आनंदा सकपाळ यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. बुद्ध वंदना घेण्यात आली . मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रभाकर सकपाळ, अनंत पवार, विलास सकपाळ गुरुजी, दिलीप मोहिते, संजय मोहिते , मिलिंद जाधव, मनोहर कदम, माजी चिटणीस सुहास पवार , दिवाकर जाधव, रोहीत जाधव सर, सुभाष सावंत, नितीन मोहिते , दत्ताराम मोहिते , उल्हास कदम , सतीश जाधव, संजय जाधव, अतुल कदम, संजय मोहिते, सौ शर्मिला पवार यांच्या सह अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरचिटणीस संदेश पवार यांनी मानले.












