चिपळूण पंचायत समितीच्या आवारातच कचऱ्याचे साम्राज्य
चिपळूण (वार्ताहर) :तालुक्यात दरवर्षी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवले जाते. हे अभियान पंचायत समितीमार्फत राबवताना सर्व ग्रामपंचायतींना त्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. जेणेकरून कचरा कुठेही न दिसता परिसर स्वच्छ व्हावा. मात्र, चिपळूण पंचायत समितीच्या मागील बाजूस कचऱ्याचा ढीग असून पावसामुळे अस्वच्छता दिसत आहे. स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी पंचायती समिती सांगत असते. मात्र इथे स्वतःच्या आवारात कचऱ्याचे ढीग आहेत. म्हणजेच लोकासंगे ब्रह्मज्ञान आपुले कोरडे पाषाण असे पंचायत समितीच्या बाबतीत दिसून येत आहे.
चिपळूण पंचायत समितीचे ठिकाण तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी ग्रामीण भागातून अनेक नागरिक आपल्या प्रशासकीय कामासाठी येत असतात. त्यामुळे वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशभर राबवले जाते. जिल्हास्तर, पंचायत स्तर आणि ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा स्वच्छ अभियान राबवताना पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना पारितोषिक सुद्धा दिले जाते. मात्र तालुक्याची पंचायत समिती स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना तालुक्यातील ग्रामपंचायतींना देत असते. जेणेकरून गावा मधील परिसर स्वच्छ करून या अभियानाचे महत्त्व सर्वांना पटावे. तिथला परिसर स्वच्छ व्हावा. पावसाळ्यात रोग राई पसरू नये. मात्र चिपळूण पंचायत समितीच्या इमारतीच्या मागील बाजूस स्वच्छतागृहाकडे जाताना आपण पाहिल्यास त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग दिसून येतो. मागचा परिसर हा स्वच्छच केलेला दिसून येत नाही. मागे आंब्याचे झाड असल्यामुळे पाठीमागे आंबे पडून ते कुजलेल्या अवस्थेत दिसून येतात. या स्वच्छतागृहाकडे पुरुषवर्ग जात असतो. त्यांना दुर्गंधीचा त्रास सोसावा लागतो. स्वच्छ अभियानाचे धडे गावागावा देणाऱ्या चिपळूण पंचायत समितीच्या आवारातच कचऱ्याचा ढीग दिसून येत असेल स्वच्छ भारत अभियानाचे वाजले की बारा असे बोलले जात हे. हे अभियान कृतीत राबवले जाते की कागदावरच असते याची सुद्धा चर्चा होत आहे. पंचायत समितीचा परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टीकडे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील यांनी लक्ष द्यावे असे बोलले जात आहे.










