कायमचे बंद होणार हे फोन; सरकारचा कठोर निर्णय, तुमच्यासोबतही असं झालं का?

मुंबई : डिजिटल पेमेंट व ऑनलाइन व्यवहार जितके वाढले आहेत, तितकंच घोटाळ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. उन्हाळ्यात स्कॅमर्स अॅक्टिव्ह झाले असून ऑनलाइन स्कॅममध्ये मोठी वाढ झाली आहे. आता तुम्ही विचार करत असाल, की उन्हाळा व घोटाळ्याचा संबंध काय, तर उन्हाळ्यात विजेचा वापर जास्त होतो.

त्याचाच ते फायदा उचलतात. सध्या वीज विभागाच्या केवायसी अपडेटचा घोटाळा होत आहे. यात स्कॅमर्स वीज विभागातले अधिकारी बनून लोकांना मेसेज करत आहेत आणि त्यांना केवायसी अपडेट करायला सांगत आहेत. हे न केल्यास घराचा वीजपुरवठा कापला जाईल, असं ते म्हणतात.

या मेसेजमध्ये लिंक्सदेखील देण्यात येतात. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती स्कॅमरपर्यंत पोहोचते. ते याचाच फायदा घेतात आणि तुमची फसवणूक करतात. हे थांबवण्यासाठी दूरसंचार विभागाने कठोर पावलं उचलली आहेत. विभागाने 392 मोबाइल नंबर्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. हे मोबाइल फोन वीज केवायसी अपडेट घोटाळ्यात वापरले जात होते.

चक्षू पोर्टलवर करा तक्रार

सरकारला चक्षू पोर्टलवरून हे कळलं आहे. सरकारने मदतीसाठी हे पोर्टल तयार केलं आहे. तुम्हाला अनोळखी कॉल किंवा मेसेज आला तर तुम्ही या पोर्टलवर जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. जेव्हा वीज विभागाचे अधिकारी असल्याचा बहाणा करून स्कॅमर्सनी केवायसी अपडेट करण्यासाठी मेसेज पाठवण्यास सुरुवात केली, तेव्हा लोकांनी चक्षू पोर्टलवर त्याबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरकारने एआयच्या मदतीने तपास केला आणि 392 मोबाइल फोन आणि 31,740 हून अधिक मोबाइल नंबर शोधले. त्यांचा वापर स्कॅमर्स वीज केवायसी अपडेट स्कॅमसाठी करत होते.

स्कॅमपासून कसं वाचायचं

अशा स्कॅमपासून वाचण्यासाठी आपले बँक डिटेल्स, ओटीपी किंवा अकाउंट नंबर अशी खासगी माहिती कुणालाही सांगू नका. अशा माहितीचा गैरवापर केला जातो. याशिवाय अनोळखी मेसेज आणि लिंकवर क्लिक करू नका. तुम्हाला वीज विभागाची माहिती हवी असल्यास त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. याशिवाय अनोळखी कॉल, मेसेजवर केवायसी शेअर करू नका. ऑनलाइन विजबिलासाठी स्ट्राँग पासवर्ड वापरा आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करा.