शेतकऱ्यांच्या केवायसी साठी वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी पोहचले घरोघरी..

तोक्ते वादळ नुकसानी पासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून प्रयत्न..

तहसीलदारांच्या समाजभिमुख कामाचे होत आहे कौतुक

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यात तोक्ते वादळाच्या नुकसानी पासून शेतकरी वंचित राहू नयेत यासाठी केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी आज सुट्टी असूनही स्वतः तहसीलदार ओंकार ओतारी यांनी कर्मचाऱ्यांसमवेत जाऊन त्यांची केवायसी पूर्ण केली. तहसीलदार यांच्या या समाजभिमुख कामाचे तालुक्यात कौतुक होत आहे. बऱ्याच वेळी सरकारी काम आणि सहा महिने थांब असे अनेकांना अनुभवायला मिळते. वेंगुर्ले मध्ये मात्र आज तहसीलदार यांनी सरकारी काम आजच पूर्ण करा असे म्हणत सुट्टी असून सुद्धा हा धडक कार्यक्रम राबविला.

तालुक्यात 39 अशी प्रकरणे प्रलंबित होती. मोचेमाड, अणसुर, पाल, तुळस, खानोली या गावातील ही प्रकरणे तात्काळ पूर्ण करण्यासाठी तहसीलदार ओंकार ओतारी यांनी आज कर्मचारी स्वप्नील गावडे, महा ई सेवा केंद्राचे राहुल प्रभू साळगावकर, चालक संदीप परब यांना घेऊन दिवसभर त्या त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन हे केवायसी चे काम 18 शेतकऱ्यांचे पूर्ण केले.

त्याच प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणच्या मयत लोकांच्या वारसांचे नंबर मिळवून हे काम लवकर पूर्ण कराण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. मुंबईचे रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांना तेथील महा ई सेवा केंद्राचे पत्ते देऊन कागदपत्र पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले. आपल्या वेंगुर्ले तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचा निधी परत जाऊ नये यासाठी तहसीलदार यांनी ही धडक मोहीम स्वतः हाती घेतली.