खेड शहरामध्ये एकदिशा मार्गाचा होणार अवलंब

एकदिशा अंमलबजावणीसाठी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांचा पुढाकार;

खेड(प्रतिनिधी)शहराचा वाढता विस्तार, वाहनांची वाढणारी बेसुमार संख्या, अरूंद रस्ते अन् बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे यंत्रणांसह साऱ्यांचीच डोकेदुखी कायमच आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आखलेल्या एकदिशा अंमलबजावणीचा फतवा प्रत्यक्षात अंमलात आणून वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा आणण्यासाठी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी लवकरच एकदिशा मार्ग अंमलबजावणीची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई चा बडगा उगारण्यात येणार आहे

शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असताना दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्याही तितक्याच प्रमाणात दिवसागणिक वाढत आहे. शहरातील रस्ते, आधीच अरूंद आहेत. त्यातच याच रस्त्यावर परप्रांतीयांसह काही स्थानिक व्यावसायिकांनीही अतिक्रमण केले आहे. भररस्त्यातच परप्रांतीय बस्तान ठोकत असल्याने वाहतूक कोंडीत भर
पडत आहे.

वाहने उभी करण्यासाठी वाहनतळांची व्यवस्था करण्याची नगर परिषदेची जबाबदारी असतानाही पोलीस यंत्रणेकडेच बोट दाखवत नगर प्रशासन वर्षानुवर्षे जबाबदारीच झटकत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी शहरातील जटील बनलेला वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढून नगर परिषदेच्या कागदावरच राहिलेल्या एकदिशा मार्गाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याचा महत्त्वाकांक्षीच निर्णय घेतला आहे.

येत्या काही दिवसातच एकदिशा मार्गाची अंमलबजावणी मोहीम राबवण्यात येणार असून तसा पत्रव्यवहारही नगर प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचे समजते. एकदिशा मार्गाची अंमलबजावणी मोहीम अधिक तीव्रपणे राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी बाजारपेठेतील मोक्याच्या ठिकाणी कोणत्याही क्षणी पोलिसांची पथके दाखल होणार आहेत