जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर निरवडे येथे ‘शत ‘ वृक्ष लागवड

 

 

वनविभाग आणि तालुका पत्रकार संघाचा उपक्रम 

सावंतवाडी । प्रतिनिधी : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी तसेच वाढते ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी वृक्षतोड थांबवणे तसेच अधिकाधिक वृक्षांची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. झाडांमुळे आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळतो तर फळे देणारी झाडे शरीराला लागणारी जीवनसत्वे देतात. निसर्गाचे चक्र सुरळीत सुरू राहते. त्यामुळे झाडे लावा आणि जगवा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले.

शतकोटी वृक्ष लागवडीच्या महाराष्ट्र शासनाच्या संकल्पाच्या व जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि आजगाव वनपरिमंडल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. यावेळी जांभूळ, सुरू आणि वड आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले. सुमारे शंभरहून अधिक झाडे यावेळी वनविभागाच्या जमिनीमध्ये लावण्यात आली.

यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये राज्य मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्याध्यक्ष गजानन नाईक, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, आजगाव वन परिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, माजी तालुकाध्यक्ष विजय देसाई, तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर, कार्यकारणी सदस्य नरेंद्र देशपांडे, तसेच पाडलोस वनरक्षक अप्पासो राठोड, इन्सुली वनरक्षक संग्राम पाटील, पाडलोस वनसेवक चंद्रकांत पडते आदी उपस्थित होते.

यावेळी वटवृक्ष लावण्याची पद्धत त्याच्यापासून मिळणारे फायदे याची माहिती माजी अध्यक्ष विजय देसाई यांनी दिली. तर जांभूळ वृक्षाचे महत्त्व आणि फायदे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी विषद केले. वृक्ष लागवडीमध्ये अभिमन्यू लोंढे, अमोल टेंबकर तसेच पत्रकार नरेंद्र देशपांडे यानी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी तर शेवटी तालुका पत्रकार संघाने वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल वनविभागाच्यावतीने पृथ्वीराज प्रताप यानी आभार व्यक्त केले.