कंटेनर दुकानात घुसल्याने अन्य गाड्यांचेही नुकसान
पेडणे : निवृत्ती शिरोडकर
मुंबई – गोवा महामार्गावर पेडणे पोरस्कडे येथील माऊली मंदिर जवळ कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने मालवाहू कंटेनर प्रथम खांब्याला धडकून नंतर रस्त्याशेजारी असलेल्या दुकानात घुसला. कंटेनरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर होऊन चालक प्रवीण गायकवाड (३५, रा. गुजरात) याचा उपचार दरम्यान बांबोळीत मृत्यू झाला. क्लिनर जगदीश दयाभाई (२६, रा. गुजरात) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत. पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान सदर अपघात झाला. महाराष्ट्रातून पणजीच्या दिशेने कंटेनर (जीजे ०३ ए झेड ६२५२) जात होता. पोरस्कडे येथे पोचला असता गाडीवरील चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनरने प्रथम वीज खांब्याला धडक दिली. त्यानंतर नाडकर्णी याच्या दुकानात हा ट्रक घुसला. यावेळी बाहेर घराशेजारी असलेल्या न्यानो गाडी तसेच दोन दुचाकीना या अपघातात कंटेनरने चिरडले. तिनही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्यांना पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी गाडीचे केबिन कापून बाहेर काढले. नंतर रुग्णवाहिकेतून प्रथम तुये येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले. प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना गोवा वैद्यकीय इस्पितळात बांबोळी येथे नेण्यात आले. या दरम्यान उपचार सुरू असताना चालक प्रवीण गायकवाड याचा मृत्यू झाला. पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला . पुढील तपास पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे करत आहेत.











