सीए जयंती कुळकर्णी
कुडाळ
आयकर कायद्या अन्वये उद्योग किंवा व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तीने नियमित हिशेबाची पुस्तके ठेवणे आवश्यक आहे आणि पुढे त्याला त्याच्या खात्यांचे लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे.
लहान करदात्यांना लेखापुस्तके ठेवण्याच्या कंटाळवाण्या कामापासून आणि ऑडिट करण्यापासून दिलासा देण्यासाठी आयकर कायद्याने कलम ४४ एडी, कलम ४४ एडीए आणि कलम ४४ एई अंतर्गत अनुमानित कर आकारणी योजना तयार केली आहे. अनुमानित कर आकारणी योजनेचा अवलंब करणारी व्यक्ती विहित दराने उत्पन्न घोषित करू शकते आणि त्या बदल्यात लेखा पुस्तके ठेवण्याच्या व ऑडिट करण्यापासून सुटका करून घेऊ शकते. मात्र यासाठी समाविष्ट असलेले व्यवसाय व काही अटी व शर्तींची पालन करावे लागते.त्याची माहिती आपण या लेखात घेऊया.
कलम ४४ एडीची अनुमानीत कर आकारणी योजना –
१. ही योजना निवासी व्यक्ती, रहिवासी हिंदू अविभक्त कुटुंब आणि निवासी भागीदारी फर्म यांनाच लागू आहे.
२. ही योजना स्वीकारणाऱ्या व्यक्तीने कलम १०ए, १०एए, १०बी, १०बीए, ८०एचएच ते ८०आर आरबी या कलमान अंतर्गत कपातीसाठी कोणतीही वजावट घेतलेली असता कामा नये.
३. कलम ४४ एई अंतर्गत मालवाहू गाड्या चालवणे, भाड्याने देणे, कोणताही एजन्सी व्यवसाय करणारी व्यक्ती, कमिशन व ब्रोकरेच्या स्वरूपात उत्पन्न मिळवणारी व्यक्ती यांना ही योजना लागू नाही.
४. व्यवसायाची एकूण उलाढाल रू. दोन कोटी पेक्षा जास्त असू नये. मात्र ९५% उलाढाल डिजिटल पेमेंट द्वारे असेल तर त्याची मर्यादा रुपये तीन कोटी एवढी आहे.
५. जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर एकूण उलाढालीच्या ८% एवढा नफा दाखवता येईल. मात्र डिजिटल पेमेंट असेल तर हाच नफा ६% एवढा दाखवता येईल. त्यासाठी सगळे खर्च किंवा वजावट मिळाली आहे असे गृहीत धरण्यात येईल. तथापि एखादी व्यक्ती स्वेच्छेने हे उत्पन्न ८%/६% पेक्षा जास्त सुद्धा घोषित करू शकते.
६. एखादी व्यक्ती ८% पेक्षा कमी उत्पन्न घोषित करू शकते. मात्र असे केल्यास आणि तुमची मिळकत सूट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला ४४ एए या कलमाखाली सगळ्या प्रकारचे हिशेब ठेवून लेखापरीक्षण करून घ्यावे लागेल.
७. जर एखाद्या व्यक्तीने अनुमानित कर आकारणी योजनेची निवड केली तर त्याला पुढील ५ वर्षांसाठी देखील त्याच योजनेचे पालन करणे आवश्यक आहे. जर पुढील ५ वर्षे पालन केले नाही तर त्याच्या पुढील ५ वर्षे अनुमानित कर आकारणी योजना उपलब्ध होणार नाही.
कलम ४४ एडीए नुसार विशिष्ट व्यवसायिकांना नफा गणना करण्याची ही तरतूद आहे.
यामध्ये खालील व्यावसायिकांचा समावेश होतो कायदेशीर सल्लागार, वैद्यकीय व्यावसायिक, अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र, अकाउंटन्सी, तांत्रिक सल्लागार, अंतर्गत सजावट आणि आणि इतर अधिसूचित व्यावसायिक.
१. या तरतुदीनुसार व्यावसायिकांना एकूण उलाढालीच्या ५०% उत्पन्न घोषित करू शकता. यामध्ये इतर सर्व खर्चांचा समावेश झालेला आहे असे गृहीत धरण्यात येईल.
२. एकूण उलाढाल रुपये ७५ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
३. इतर सर्व अटी ४४ एडी या कलमानुसार लागू राहतील.
कलम ४४एई ही अनुमानित कर आकारणी योजना –
१. आयकर कायद्याचे कलम ४४ एई नुसार मालवाहू गाड्या चालविणे, भाड्याने देणे, किंवा भाड्याने घेणे या व्यवसायात असलेल्या व्यक्तींना ही दिलासा देणारी तरतूद आहे.
२. करदात्याकडे आर्थिक वर्षात कोणत्याही वेळी दहापेक्षा जास्त मालवाहू वाहने असू नयेत ३. या योजनेनुसार रु. ७५००/- हलक्या वाहनांसाठी (७५०० किग्रॅ. पर्यंत एकूण वाहनाच्या वजनासह) प्रतिवाहन, प्रति महिना उत्पन्न गृहीत धरले जाईल.
४. अवजड वाहनासाठी(७५०० किग्रॅ. पेक्षा जास्त एकूण वाहनाचे वजन असलेले) रु. १००० प्रति टन प्रति महिना यानुसार पण घोषित करू शकता.
५. अनुमानीत दरापेक्षा तुम्ही जास्त उत्पन्न घोषित करू शकता मात्र तुमचे उत्पन्न रु.७५००पेक्षा प्रतिवाहन, प्रति महिना कमी असेल तर तुम्हाला लेखी हिशेब ठेवणे व लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे.
तरी आपण वरील सर्व तरतुदी विचारात घेऊन आपल्याला फायदेशीर पर्यायाचा वापर करू शकता.सर्वसामान्य करदात्याला या तरतुदींची माहिती व्हावी यासाठी हा लेख लिहिला आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या करसल्लागाराशी सल्ला मसलत करून पुढील कार्यवाही करू शकता.












